हजार वर्षे होत आली तरी ताठ उभे असलेले रामाप्पा मंदिर

भारतात प्रत्येक राज्यात असंख्य देवळे आणि मंदिरे आहेत. बहुतेक मंदिरे कुणा ना कुणा देवी देवतांना समर्पित असतात. तेलंगाना राज्यात तर प्रचंड मोठी मंदिरे बांधली गेली आहेत आणि त्यातील काही तर कित्येक शतकांपूर्वी बांधली गेली आहेत. येथील एक मंदिर आहे रामाप्पा मंदिर. याचे विशेष म्हणजे या मंदिराचे नाव ते बांधणाऱ्या शिल्पकारावरून ठेवले गेले आहे. हे मंदिर शिव मंदिर आहे त्यामुळे त्याला रामलिंगेश्वर मंदिर सुद्धा म्हटले जाते.

तेलंगणाच्या मुलुगु जिल्ह्यात पालमपेट नावाचे एक छोटे गाव आहे. तेथेच हे मंदिर १२१३ साली म्हणजे सुमारे ८०० वर्षापूर्वी बांधले गेले आहे. याची कथा अशी सांगतात की आंध्रप्रदेशातील काकतिया वंशाचा महाराजा गणपती देव याच्या मनात शिवमंदिर बांधण्याचा विचार आला तेव्हा त्याने त्याचा शिल्पकार रामाप्पा याला असा आदेश दिला की असे मंदिर बांध जे शतकानुशतके टिकले पाहिजे. रामाप्पाने राजाज्ञा शिरसावंद्य मानली. त्याने अतिशय कौशल्याने एक अतिभव्य, सुंदर आणि विशाल मंदिर बांधले.

हे मंदिर पाहून राजा इतका खुश झाला की त्याने या मंदिराला रामाप्पाचे नाव दिले. १३ व्या शतकात भारत भेटीवर आलेला इटालियन व्यापारी आणि प्रवासी मार्को पोलो याने या मंदिराचे वर्णन करताना,’ मंदिरांच्या आकाशगंगेतील एक तेजस्वी चमकता तारा’ असे केले आहे.

आज इतकी वर्षे लोटूनही हे मंदिर भक्कम उभे आहे. देशातील बाकी प्राचीन मंदिरे भग्न होत असताना हे मंदिर इतके भक्कम कसे याचे आश्चर्य वाटत होते. त्यामुळे पुरातत्व विभागाने या मागचे रहस्य शोधण्यासाठी अनेक मार्ग वापरले पण रहस्य उलगडले नाही. अखेरी मंदिराचा एक दगड काढून त्याची परीक्षा केली तेव्हा हे दगड पाण्यावर तरंगत आहेत असे दिसले. याचा अर्थ अतिशय हलक्या दगडातून हे मंदिर उभारले गेले आणि त्यामुळेच ते भक्कम बनले आहे.

प्रश्न उरतो तो असा की इतके हलके दगड रामाप्पाला मिळाले कुठून. एक रामसेतू सोडला तर इतके हलके दगड कुठेच मिळत नाहीत. मग रामाप्पा कडे हलके दगड तयार करण्याची काही गुप्त पद्धत होती का? यावर आता संशोधन केले जात आहे.