असा आहे ‘फादर्स डे’ चा इतिहास आणि महत्व


एखाद्या मुलांच्या आयुष्यात जेवढी आईची गरज असते तेवढीच गरज वडिलांची देखील असते. वडिलांची माया म्हणजे आभाळ माया. काही वडील अनेकवेळा आपल्या सुखांचा त्याग करुन, काबाडकष्ट करुन आपल्या लेकरांचा आणि कुटुंबाचा सांभाळ करतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कशी खुश राहिल याकडे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचा कटाक्ष असतो. त्यांनी केलेल्या त्यागाची, उपकाराची, निस्वार्थ प्रेमाची आणि अथक प्रयत्नांची जाणीव व्हावी म्हणून आज फादर्स डे साजरा करण्यात येतो.

जगभरात फादर्स डे साजरा करण्याची तारीख वेगवेगळी आहे. पण सर्वाधिक देशांमध्ये फादर्स डे जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो. पारंपरिकरित्या स्पेन आणि पोर्तुगालमध्ये हा दिवस 19 मार्च, तैवानमध्ये 8 ऑगस्ट, थायलंडमध्ये 5 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. 20 जूनला भारतात हा दिवस साजरा करण्यात येत आहे.

फादर्स डे साजरा करण्यास कशी सुरुवात झाली याच्याबद्दल जगभरात मतमतांतरे आहेत. काही ठिकाणी असे सांगण्यात आले आहे की स्मार्ट डोड नावाच्या एका महिनलेने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. तिचे आणि तिच्या पाच भावंडांचे पालन-पोषण तिच्या वडिलांनी केल्यामुळे तिने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. आपल्या वडिलांचा वाढदिवस हा 5 जूनला असतो, त्यामुळे हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी करत तिने न्यायालयात एक याचिका दाखल केली. न्यायालयाने तिची याचिका रद्द केली. पण तिच्यामुळे असा दिवस साजरा करावा अशी अनेकांनी नंतर मागणी केली.

तर 20 जून 1910 रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये फादर्स डे साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यात बदल करुन अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी 1 मे 1972 रोजी फादर्स डे निमित्त राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली. त्या आधीही काही ठिकाणी 18 मे रोजी हा दिवस साजरा करण्यात येत होता. पण नंतर पुन्हा जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्यास सुरुवात झाली.