घर सजविताना ह्या तसबिरी घरामध्ये ठेवणे टाळा


घराची सजावट करीत असताना आपण अनेकदा सुंदर भासणारी पेंटींग, पोस्टर्स, चित्रे भिंतींवर लावीत असतो. घर आकर्षक दिसावे हा त्यामागचा उद्देश असतो. पण वास्तूशास्त्रामध्ये, आपण घर सजविताना कोणत्या प्रकारची चित्रे लावणे टाळायला हवे, ह्याचे स्पष्ट उल्लेख आहेत. जर अशी चित्रे घरामध्ये लावली गेली, तर घरामध्ये नकारात्मक उर्जेचा संचार होऊन सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अडचणींचा अनुभव येऊ लागतो. आर्थिक समस्या, आजारपणे अश्या प्रकारच्या नकारात्मक परिस्थिती देखील ओढवितात. त्यामुळे घरामध्ये सजावटीसाठी तसबिरी लावताना काही प्रकारची चित्रे लावणे टाळायला हवे.

एखाद्या चित्रामध्ये रडणारी किंवा उदास मुले असतील, तर हे चित्र घरामध्ये लाऊ नये. वातुशास्त्रानुसार हे चित्र दुर्भाग्यासाठी कारणीभूत ठरू शकते. तसेच वाहत्या पाण्याची किंवा झऱ्याची चित्रे घरामध्ये लावू नयेत. अश्या प्रकारची चित्रे आर्थिक तंगी ला कारणीभूत ठरू शकतात. त्याउलट पाण्याने भरलेल्या घड्याचे चित्र घरातील दर्शनी भिंतीवर असण्याने आर्थिक सुबत्ता त्या घरामध्ये नांदते असे वास्तुशास्त्र सांगते. ज्या घरामध्ये वाहत्या पाण्याची चित्रे असतील, त्या घरामध्ये संपत्ती फारशी टिकून राहू शकत नाही.

घरामध्ये कोणत्याही हिंसक प्राण्यांच्या तसबिरी असू नयेत. त्यामुळे घरामध्ये सतत तणावाचे वातावरण असू शकते, तसेच घरातील सदस्यांच्या मनामध्ये एकमेकांच्या प्रती नकारात्मक भावना, किंवा आपापसात भांडणे असतात. त्याचप्रमाणे पाण्यामध्ये बुडणाऱ्या नावेचे किंवा जहाजाचे चित्र ही घरामध्ये असू नये. ह्यामुळे ही घरामध्ये नकारात्मक उर्जेचा संचार होतो. घरामध्ये युद्ध दर्शविणारी किंवा जादुगाराची प्रतिमा असलेले चित्र लाऊ नये, ही चित्रे घरामध्ये नकारत्मक वातावरण निर्माण करतात आणि तणावासाठी कारणीभूत ठरू शकतात. घरामध्ये चित्रे लावताना ती चित्रे पाहून आपले मन प्रसन्न व्हायला हवे अशी चित्रे असावीत.

Leave a Comment