या ठिकाणी पांडवांना मिळाली ‘पापमुक्ती’

pandav
भारतीय संस्कृतीमध्ये अनेक कथा, आख्यायिका प्रसिद्ध आहेत. यातील अनेक आख्यायिका आपल्याला चकित करणाऱ्या आहेत. भारतातील मंदिरे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत, या प्रत्येक मंदिराशी निगडित काही इतिहास आहे, काही समजुती, मान्यता आहेत आणि काही आख्यायिकाही आहेत. या आख्यायिका कितपत सत्य आहेत हे नेमके सांगणे कठीण असले, तरी या आहेत मात्र अतिशय रोचक. यांच्या सत्यासत्यतेची पडताळणी करण्यासाठी आजही इतिहासकार आणि पुरातत्ववेत्ते प्रयत्नशील आहेत.
pandav1
अशीच रोचक आख्यायिका आहे, अरब सागरामध्ये असलेल्या एका प्राचीन शिव मंदिराची. गुजरातेतील भावनगर येथे ‘निष्कलंक’ महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर भावनगरच्या कोलीयाक सागरी किनाऱ्यापासून तीन किलोमीटर समुद्राच्या आतमध्ये आहे. अरब सागराच्या विशाल लाटा या मंदिरापाशी येत असतात. महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना या मंदिरामध्ये पायी यावे लागते. अतिशय मंत्रमुग्ध करून, मन भारावून टाकणारे असे हे मंदिर आहे. समुद्रामध्ये भरती असताना केवळ या मंदिराची ध्वजपताका दृष्टीस पडते. ओहोटीच्या वेळी जसजसे पाणी ओसरत जाते, तसे संपूर्ण मंदिर दृष्टीस पडू लागते. त्यामुळे मंदिरापर्यंत जाण्यासाठी भाविकांना ओहोटीची वाट पहावी लागते.
pandav2
या मंदिराच्या इतिहासाचे नाते महाभारताशी जोडले जाते. महाभारताचे युद्ध संपल्यानंतर पांडव अतिशय दु:खी मनस्थितीमध्ये होते. आपल्याच आप्तेष्टांची युद्धामध्ये हत्या करावी लागल्याचा सल त्यांच्या मनामध्ये होता. स्वकीयांच्या हत्येने माथी आलेल्या पापातून मुक्ती मिळविण्यासाठी पांडवानी याच ठिकाणी तपस्या केली असता, महादेव स्वतः येथे प्रकट झाले आणि शिवलिंगाच्या रूपामध्ये त्यांनी पांडवांना येथे दर्शन दिल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. महादेवांनी दर्शन दिल्याने पांडवांना त्यांच्या हातून घडलेल्या पापांतून मुक्ती मिळाली आणि ते निष्कलंक झाले, आणि म्हणूनच या मंदिराचे नाव ‘निष्कलंक महादेव मंदिर’ पडले. आज ही येथे येऊन मनापासून भक्ती करणाऱ्या भाविकांना त्यांच्या हातून घडलेल्या पापांतून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे.
pandav3
या मंदिरामध्ये पाच स्वयंभू शिवलिंगे आहेत. प्रत्येक शिवलिंगाच्या समोर एका नदीची प्रतिमा लावलेली आहे. एका चौकोनी मोठ्या चबुतऱ्यावर ही शिवलिंगे असून, याच चबुतऱ्यावर एक लहानसे तळे आहे. या तळ्याला पांडव तळे म्हटले जाते. मंदिरामध्ये पूजा करण्यास जाण्यापूर्वी भाविकांनी या तळ्यामध्ये हात पाय स्वच्छ धुवून मगच मंदिरामध्ये प्रवेश करावा असा प्रघात आहे.

Leave a Comment