शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या बॅनरचा एक फोटो ट्विट करत निलेश राणे यांची टीका


मुंबई – एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वच राजकीय पक्षांनी कोरोनाच्या संकटात एकत्र येण्याचे आवाहन केलेले असतानाच दुसरीकडे मात्र शिवसेनेवर भाजपकडून खोचक शब्दांमध्ये निशाणा साधण्यात येत आहे.

शिवसेनेला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लक्ष्य करणारे भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बॅनरवरून शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, शिवसेनेचे स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्यावर देखील त्यांनी शेलक्या शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. शनिवारीच सिंधुदुर्गमध्ये एका पेट्रोल पंपावर शिवसेना आणि राणेसमर्थक भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा वाद रंगताना दिसू लागला आहे.


शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या एका बॅनरचा फोटो भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करून त्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचा वर्धापन दिनाचा बॅनर पण शिवसेना आमदार नाईकसारखा निघाला. एका तासात उलटा झाला. शिवसेना पक्षाची हालत पण या बॅनरसारखीच झाली आहे. वाईट वाटते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी. त्यांनी पक्षाची सुरुवात केली वाघांना घेऊन. संपणार कुत्र्यांमुळे, असे आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे यांनी म्हटले आहे.