कर्णधार विराट कोहलीचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अनोखा रेकॉर्ड


साउथॅम्प्टन: सध्या इंग्लंडमधील साउथॅम्प्टनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. टीम इंडियाच्या कसोटी सामन्यात सर्वाधित सामन्यांत कर्णधार म्हणून नेतृत्त्व करणारा खेळाडू विराट कोहली बनला आहे. विराटने यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीलाही मागे टाकले आहे. विराट कोहली एकामागोमाग एक रेकॉर्ड आपल्या नावे करत आहे.

भारताच्या वतीने कर्णधार म्हणून विराट कोहली 61वा कसोटी सामना खेळत आहे. हा एक अनोखा रेकॉर्ड आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने 60 कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून टीम इंडियाचे नेतृत्त्व केले होते. तसेच विराटच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने अनेक ऐतिहासिक विजय नोंदवले आहेत.

कर्णधार म्हणून विराट कोहलीने आतापर्यंत 61 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 36 सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर 14 सामन्यांत पराभव झाला आहे. तसेच त्यापैकी 10 सामने अनिर्णित सुटले आहेत. ही आकडेवारी पाहता, विराटच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने विजयी वाटचाल कायम ठेवली असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

घरगुती मैदानावर विराट कोहलीच्या नावे सर्वाधिक 10 कसोटी सामने जिंकल्याचा रेकॉर्डही नोंदवण्यात आला आहे. हा रेकॉर्ड विराट कोहली व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगच्या नावेही आहे. आतापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांमध्ये कोहलीचे नाव घेतले जाते.

काल (शनिवारी) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरु झाला. पावसामुळे शुक्रवारी पहिल्या दिवसाचा खेळ पाण्यात गेल्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याला आजपासून सुरुवात झाली. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रोहित आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात करुन दिली. पण पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर कालही अंधूक प्रकाशामुळे खेळात व्यत्यय आला. भारताने दुसऱ्या दिवसअखेर 64.4 षटकात 3 विकेट्स गमावत 146 धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे अर्धशतकी भागीदारी रचत मैदानात आहेत.

भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची आश्वासक सुरुवात केली. 61 धावांवर रोहित 34 धावांवर बाद झाला. काईल जेमीसनने रोहितला बाद केले. रोहित बाद झाल्यानंतर लगेच नील वॅग्नरने शुभमनला बाद केले. शुभमनने 28 धावा केल्यानंतर चेतेश्वर पुजारा 8 धावांवर बाद झाला. पुजारानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेसह विराटने भारताला शतकी पल्ला गाठून दिला. तिसऱ्या सत्रानंतर अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर पुन्हा खेळ सुरु झाला. मात्र 46 व्या षटकात अंधूक प्रकाशामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला. विराट कोहली 44 तर अजिंक्य 29 धावांवर नाबाद आहेत.