ह्या आहेत अजब फेशियल ट्रीटमेंटस्


त्वचेचे सौंदर्य जपण्याकरिता, त्वचा नितळ, तरुण दिसावी ह्या करिता अनेक तऱ्हेच्या फेशियल ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. एक काळ असा होता की ह्या ट्रीटमेंट बहुतेक महिलाच जास्त करून घेत असत. आपण आता पुरुषही आपल्या त्वचेची निगा राखण्याचे महत्व समजू लागल्याने फेशियल ट्रीटमेंट घेण्यासाठी महिलांच्या इतकीच पुरुषांची देखील गर्दी ब्युटी सॅलोन्समध्ये पाहायला मिळत असते. फेशियल ट्रीटमेंट मध्ये अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यातूनही त्वचेचा विशिष्ट पोत, त्वचा कोरडी आहे किंवा तेलकट आहे हे लक्षात घेऊन, त्वचेवर मुरुमे, किंवा सुरकुत्या आहेत किंवा नाहीत ह्या सर्व गोष्टींचा विचार करून फेशियल ट्रीटमेंट केल्या जात असतात.

फेशियल ट्रीटमेंट, किंवा ब्युटी थेरपीची परंपरा ही आजच्या युगातील नाही. ख्रिस्तपूर्व ४००० वर्षांपासून महिला आपल्या सौंदर्याच्या बाबतीत अतिशय जागरूक असल्याचे दिसून येते. ह्याचे उदाहरण म्हणजे, इजिप्शियन स्त्रिया डोळ्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी काजळाचा वापर करीत असल्याचे पुरावे सापडले आहेत. तसेच किड्यांच्यापासून काढले गेलेले पिग्मेंट वापरून त्या स्त्रिया आपल्या ओठांना आणि गालांना लालसर छटा देत असत. अनेक शतकांपूर्वी, त्वचेवरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी जेव्हा क्रीम्स किंवा शेवर्सचा शोधही लागला नव्हता, तेव्हा ह्या कामी युरोप मधील स्त्रिया आर्सेनिक, आणि चुन्याच्या पेस्टचा वापर करीत असत. तसेच त्वचा गोरी दिसावी ह्याकरिता पांढऱ्या शिसाचा लेप लावला जात असे. आजच्या युगामध्ये ह्या ब्युटी ट्रीटमेंट अस्तंगत झाल्या असल्या, तरी अजूनही काही ठिकाणी अजब फेशियल ट्रीटमेंटस् दिल्या-घेतल्या जातात. ह्या फेशियल ट्रीटमेंट करून घेण्यामध्ये जगभरातील सेलिब्रिटीज देखील आघाडीवर आहेत.

‘मॅग्नेटिक मास्क’ नामक ब्युटी थेरपी प्राचीन असून, इजिप्शियन सौंदर्यवती क्लेओपात्रा ह्या पद्धतीचा वापर करीत असल्याचे उल्लेख आहेत. आपली त्वचा सुंदर दिसावी ह्याकरिता क्लेओपात्रा एक मोठे चुंबक आपल्या डोक्यावर बांधून झोपत असे. जगप्रसिद्ध पॉप गायिका मडोना हिने आपल्या सुंदर त्वचेचे रहस्य, हे चुंबकीय मास्क असल्याचे जेव्हा एका मुलाखतीत सांगितले, तेव्हा ही ट्रीटमेंट पुनश्च लोकप्रिय होऊ लागली. ह्या मास्क मध्ये त्वचेला पोषण देणारे पदार्थ असून, त्यासोबत चुंबकाचे कणही असतात. ह्या सर्व पदार्थांची जाडसर पेस्ट करून चेहऱ्यावर दहा मिनिटे लावून ठेवल्यानंतर एका मोठ्या चुंबकाच्या मदतीने ही पेस्ट काढली जाते. ह्या पेस्टमध्ये पाण्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे चुंबकाच्या मदतीने केवळ मास्कचे पावडर रूपी कण त्वचेवरून खेचले जातात. ह्या मास्कच्या द्वारे त्वचेमधील घातक द्रव्ये ह्या चुम्बकाद्वारे खेचलली जाऊन त्वचेचे सौदर्य वाढण्यास मदत होते.

‘स्नेल स्लाइम’ पद्धतीची फेशियल ट्रीटमेंट करून घेण्यासाठी तुम्हाला थोडी हिम्मत दाखवावी लागेल, कारण ह्या ट्रीटमेंट मध्ये गोगलगाईंच्या शरीरातून द्रवणारा स्राव त्वचेवर लावला जातो. त्यासाठी भल्यामोठ्या गोगलगाई त्वचेवर ठेवल्या जातात. ह्या पद्धतीचा उपयोग पूर्वीपासून ग्रीस देशामध्ये चालत आला आहे. अपचन आणि खोकला बरा करण्यासाठी ग्रीक लोक गोगलगाईंच्या स्रावाचा वापर करीत असत. यानंतर साउथ अमेरिकेमध्ये गोगलगाईंची पैदास करीत असताना सतत गोगलगाई हाताळल्याने हातांची त्वचा अतिशय नितळ, सुंदर होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. तेव्हापासून त्वचेचे सौंदर्य निखारण्यासाठी ‘स्नेल स्लाइम’ ट्रीटमेंट केली जाऊ लागली. गोगलगायीच्या स्रावाम्ध्ये त्वचेला पोषक अशी एन्झाइम्स, ग्लायकोप्रोटीन्स, इलास्टीसीन, आणि पेपटाईडस् असतात.

मधमाशी किवा गांधील माशी आपल्याला चावू नये ह्याची काळजी आपण घेत असतो, तसेच ह्या माश्या चावल्यावर त्यांचा डंख त्वरित बाहेर काढणे आवश्यक असते, हे ही आपल्याला माहिती आहे. पण ह्या डंखामध्ये असणारे विषही फेशियल ट्रीटमेंट म्हणून वापरले जाते हे आपल्याला ठाऊक नसेल. ह्या विशिष्ट माश्यांच्या डंखामध्ये असणारे विष क्रीम मध्ये मिसळून ह्याचा वापर फेशियल साठी केला जातो. त्वचेवरील सुरकुत्या नाहीश्या करणाऱ्या ‘बोटोक्स’ला हा नैसर्गिक पर्याय आहे. तसेच पक्षांच्या विष्ठेचा उपयोगही त्वचेवरील सुरकुत्या नाहीश्या करण्यासाठी आणि त्वचेचा पोत सुधारण्यासाठी फेशियल मास्कच्या रूपात केला जातो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment