आपल्या जोडीदाराविषयी या गोष्टींबद्दल मित्रपरिवारात चर्चा करणे टाळा


आपल्या मित्रपरिवारातील आपले मित्र-मैत्रिणी ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणावयास हवेत. आपल्या आयुष्यामध्ये आलेले आनंदाचे क्षण किंवा कधी काळी आपल्याला अनुभवाला आलेल्या काही अवघड प्रसंगांबद्दल आपण आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींशी चर्चा आवर्जून करीत असतो. यामध्ये आपण आपल्या जोडीदारासोबत झालेले आपले मतभेद, किंवा त्याच्या काही ठराविक सवयी इत्यादी गोष्टींची देखील चर्चा करीत असतो. या मध्ये जोडीदाराला कमी लेखणे हा आपला उद्देश नसला, तरी काही गोष्टी अश्या असतात, ज्यांची चर्चा आपल्या मित्र-मंडळींसोबत करणे फारसे योग्य ठरत नाही, कारण हा प्रश्न तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या परस्परांवरील विश्वासाचा असतो.

तुमच्या जोडीदाराने त्याच्या किंवा तिच्या ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी घडलेल्या काही घटनांबद्द्ल, किंवा तेथील एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्याशी काही चर्चा केली, तर ही माहिती तुम्ही केवळ तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवणे अपेक्षित असते. तुमचा जोडीदार मोठ्या विश्वासाने तुम्हाला काही गोष्टी सांगत असतो. त्याची चर्चा तुम्ही, तुमच्या जोडीदाराच्या अपरोक्ष तुमच्या मित्र-मैत्रिणींशी करणे टाळावे. तसेच तुमच्या जोडीदाराने त्याच्या परिवारातील कुठल्या सदस्याबद्दल तुम्हाला काही सांगितल्यास त्याची ही चर्चा इतरत्र करणे टाळावे.

तुमच्या मित्र-मैत्रिणींचे तुमच्या जोडीदाराबद्दल काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या गुणावगुणांची चर्चा करणे आवर्जून टाळावे. कोणतीही व्यक्ती शंभर टक्के बरोबर किंवा सर्वगुणसंपन्न कधीच नसते. त्यामुळे तुमच्या मित्र-मैत्रिणींना तुमच्या जोडीदाराबद्दल काय वाटते, या पेक्षा तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटते हे जास्त महत्वाचे ठरते. तसेच आपल्या जोडीदाराचे इतरही कुठल्या व्यक्तीविषयी किंवा गोष्टीविषयी काय मत आहे, याची चर्चा इतरत्र करण्याचे टाळावे.

तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या जीवनात आलेल्या आर्थिक संकटांविषयी, किंवा परिवारातील सदस्यांमध्ये काही कारणाने झालेल्या मतभेदांविषयी सर्वत्र चर्चा करणे आवर्जून टाळायला हवे. हे आर्थिक किंवा पारिवारिक संकट कायमस्वरूपी नसल्याने, त्याची जाहीर चर्चा करीत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढता येईल याचा विचार झाला पाहिजे. त्यामुळे परस्परांवर विश्वास ठेऊन, संपूर्ण विचारांती घेतलेले निर्णय संकटांमधून यशस्वीपणे बाहेर पडण्यास मदत करतात.

आपल्या जोडीदाराला आपण भेटण्याआधी त्याच्या पूर्वायुष्यातील घटनांची चर्चा आपल्या मित्र-मैत्रिणींशी करणे टाळावे. तुमच्या जोडीदाराने तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेऊन त्याच्या पूर्वायुष्यातील काही घटना तुम्हाला सांगितलेल्या असतात. त्यामुळे त्याची चर्चा इतरत्र करणे आवर्जून टाळायला हवे. कधी कधी अस्वस्थतेच्या भरात किंवा जोडीदारावरील रागाच्या भरामध्ये आपल्यामधील मतभेदांची चर्चा आपण आपल्या मित्र-मैत्रिणींसमोर करीत असतो. पण जोडीदारासोबत झालेले मतभेद जोडीदाराबरोबर बसूनच सोडवायला हवेत. त्याने परस्परांवरील विश्वास आणि नात्यातील सामंजस्य सुधारते.

Leave a Comment