भुतांना घाबरत नसाल तर बिनधास्त या रेस्टॉरंटमध्ये जा


कुणी उघडउघड कबुल करत नसले तरी बहुतेक लोक भूताखेताना घाबरतात. भुते असतात का हा वादाचा विषय असेल पण कुठल्या पडक्या जागी, रात्री बेरात्री पैज लावली तरी बहुतेक कुणी जाण्यास होकार देत नाही. भुते कुठेही असतात पण शक्यतो पडक्या, ओसाड जागा, विहारी, वाडे, झाडे येथे नक्की असतात असा समज आहे. जे लोक भुतांना घाबरत नाहीत त्यांच्यासाठी एक मस्त ठिकाण स्पेन मध्ये आहे. हे आहे एक रेस्टॉरंट. येथे जाण्यासाठी वाघाची छाती हवी. कारण येथे भुतेच स्वागताला असतात, रक्ताळलेला सुरा अथवा तलवार घेऊन भयानक चेहऱ्याने ती तुमची मान पकडतात आणि काय खाणार असे विचारतात.


जगात अनेक प्रकारची रेस्टॉरंट आहेत पण असे रेस्टॉरंट कुठे नसेल. भुतांच्या स्वागतानंतर न घाबरता धीटपणे तुम्ही ऑर्डर दिलीत तरी आलेला पदार्थ खाताना थरथर कापावे असे वातावरण येथे आहे. स्पेन मध्ये ला मासिया एकांटडा नावाच्या या रेस्टॉरंट मध्ये मुळातच हृदय कमजोर असलेले, दम्याचे पेशंट, गर्भवती महिला आणि १४ वर्षाखालील मुलांना प्रवेशच नाही. अपंग लोकांनाही येथे प्रवेश दिला जात नाही आणि फोन व कॅमेरा आत घेऊन जाता येत नाही. येथे ग्राहकांचे मनोरंजन केले जाते तेही भूतेच करतात. जेवणाच्या मध्ये एक शो दाखविला जातो तो भीतीने रक्त गोठावे इतका भयानक असतो. येणारा ग्राहक घाबरवा असाच येथे प्रयत्न केला जातो.


हे रेस्टॉरंट सुरु झाले त्याला चाळीस वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. १७ व्या शतकात जोसेफ मा रीएसने घर बनविले मात्र त्यानंतर संपत्तीवरून वाद झाला आणि एक दिवस नाणेफेक करून दोघा भावांनी नशिबाचा कौल घेतला तेव्हा रीएस हरला व हे घर दोघाही भावांनी सोडले आणि परिवारासाठी नवी मालमत्ता खरेदी केली. त्यामुळे हे घर खंडहर बनले. २०० वर्षे ते तसेच पडून होते. मग पुन्हा एकदा या परिवाराने तेथे येऊन रेस्टॉरंट सुरु केले ते १९७० साली. हे स्थान शापित आहे अश्या भावनेने त्यांनी या रेस्टॉरंट साठी भुते ही कल्पना वापरली. ती आजही तशीच आहे.


येथे प्रत्यक्षात भुते नाहीत. येथे वेटरचा भुताचे पोशाख करतात. येथे दिवसातले फक्त तीन तास जेवण सर्व केले जाते. ६० लोक बसू शकतील अशी व्यवस्था येथे आहे पण अगोदर बुकिंग केल्याशिवाय येथे जाता येत नाही. आत प्रवेश केल्यापासून येथील भुते कोणती करामत कधी करतील याचा अंदाजच येत नाही त्यामुळे पूर्णवेळ अगदी धीट ग्राहक सुद्धा मनातून थोडे घाबरलेले असतात असा अनुभव सांगितला जातो.

Leave a Comment