बोट ठेवा आणि उघडा कुलूप


सध्याचा स्मार्टफोन, स्मार्टकार, स्मार्ट घड्याळ, स्मार्ट घरे हा ट्रेंड आता स्मार्ट कुलुपे यावर गेला असून बाजारात तुमच्या घरासाठी चोरी रोखणारी स्मार्ट कुलपे उपलब्ध झाली आहेत. स्मार्टफोन फिंगरप्रिंट वापरून ज्याप्रमाणे अनलॉक होतो त्याचप्रमाणे या स्मार्ट कुलुपावर तुम्ही बोट ठेवले कि ते उघडणार आहे. ही कुलपे की लेस म्हणजे किल्लीशिवाय आहेत. अर्थात त्यामुळे किल्ली सांभाळणे आणि ती हरविली तर कुलूप तोडणे अथवा दुसरी किल्ली करून आणणे यातून सुटका होणार आहे. विशेष म्हणजे हे कुलूप अॅपच्या सहाय्याने सुद्धा ऑपरेट करता येणार आहे.


अर्थात हे कुलूप वापरण्यासाठी त्याची बॅटरी चार्ज करावी लागेल. बॅटरी एकदा फुल चार्ज केली की स्टँडबाय मोड मध्ये तीन ते चार दिवस चालते असा उत्पादकांचा दावा आहे. युजरला कुलूप वापरताना कुलुपावर असलेल्या फिंगरप्रिंट स्कॅनरवर ३ सेकंद बोट दाबून ठेवावे लागेल. त्यावेळी निळा दिवा लागेल. आता कोणतेही १ बोट स्कॅनरवर १० वेळा टच करून लॉक सेट करता येईल. त्यावेळी हिरवा दिवा लागेल. आणि एक लांब बीप वाजेल. ग्रीन लाईट आल्यावर फिंगरप्रिंट प्रोसेस पूर्ण झाली. हीच प्रोसेस पुन्हा करून युजर १० वेगवेगळ्या लोकांचे फिंगरप्रिंट डेटा सेट करू शकेल.

फिंगरप्रिंट डेटा हटवायचा असेल तर अॅडमिनला १० सेकंद स्कॅनर दाबून ठेवायचा. लाल दिवा लागला की डेटा क्लीन झाला असे समजायचे. या कुलुपांच्या किमती ८०० रुपयांपासून आहेत. चांगल्या क्वालिटीच्या कुलुपांची किंमत अडीच हजार पर्यंत आहे. ही कुलपे दरवाजे, कपाटे अशी कुठेही वापरता येतात. ती वॉटरप्रुफ आहेत.

Leave a Comment