शिवसेनेसोबत की स्वबळावर? अजित पवारांचे मोठे वक्तव्य


पुणे – महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. यावरुन नाना पटोले यांना शिवसेनेने टोला लगावताना राज्याच्या हितासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र यावे लागेल असा सूचक इशारा दिला आहे.

विशेष म्हणजे शरद पवार यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांना एकत्र काम करावे लागेल, असे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला म्हटल्यामुळे पुढील निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होणार का अशी चर्चा रंगली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.

अजित पवारांना आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत जाणार की स्वबळावर असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितले की, निवडणुका ज्यावेळी जाहीर होतील, तेव्हा कोणाकोणाची आघाडी आणि कोणाची युती हे पत्रकार परिषद घेऊन व्यवस्थित सांगतो. आता तसले काही देखील डोक्यात नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे, किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून जी जबाबदारी स्वीकारली आहे, ती व्यवस्थित पार पाडण्याचे काम सुरु आहे. दरम्यान यावेळी शिवसेनेला अजित पवार यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.