विप्रोने एका वर्षात दुसऱ्यांदा वाढवला आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार


नवी दिल्ली: कोरोनामुळे ओढावलेल्या संकटकाळात जगभरातील अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले असून, लाखो लोकांनी आपला रोजगार गमावला आहे. तर, दुसरीकडे वर्षभरात दुसऱ्यांदा विप्रो कंपनीकडून कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीकडून शुक्रवारी पुन्हा एकदा पगारवाढ जाहीर करण्यात आली आहे. कंपनीतील जवळपास ८० टक्के कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीचा फायदा होईल, असे सांगितले जात आहे.

१ सप्टेंबर २०२१ पासून विप्रो कंपनीकडून देण्यात येणारी पगारवाढ लागू होईल. २०२१ मध्ये दुसऱ्यांदा विप्रोने आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढविला आहे. कंपनीची ही वेतनवाढ बँड ३ पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना लागू असेल. या बँडमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि त्याखालील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

जून महिन्यापासूनच पात्र कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळण्यास सुरुवात होणार आहे. व्यवस्थापक आणि त्यावरील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. देशात स्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची सरासरी पगारवाढ उच्च एकेरी अंकात, तर ऑनसाइट कर्मचाऱ्यांना मिड-सिंगल डिजिटमध्ये तसेच चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जास्त पगारवाढ दिली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

कौशल्य आधारित बोनस आम्ही देणार असल्याचे विप्रोच्या सौरभ गोविल यांनी सांगितले. आर्थिक वर्ष २०२१ च्या चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल विप्रोने जाहीर केले. चौथ्या तिमाहीत कर्मचारी कमी करण्याचा विप्रो कंपनीतील दर १२.१ टक्के होता, असे कंपनीने सांगितले आहे. २०२१ आर्थिक वर्षात कंपनीने कॅम्पसमधून १० हजार नव्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दरम्यान, विप्रो वर्षभरात दुसऱ्यांदा पगारवाढ करणारी दुसरी कंपनी आहे. यापूर्वी टीसीएसने गेल्या वर्षी दोनवेळा पगारवाढ केली होती. टीसीएसने ६ महिन्यांच्या अंतराने पगार वाढविला होता. टीसीएस कर्मचाऱ्यांच्या वेतनात ६ महिन्यांच्या कालावधीत १२ ते १४ टक्के वाढ झाली आहे.