कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे तेलंगणा सरकारने शिथिल केला पूर्णपणे लॉकडाऊनचा निर्णय


हैदराबाद – देशावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरु लागल्यामुळे देशातील अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता अजूनही काही भागात कडक निर्बंध अद्यापही लागू आहते. दरम्यान राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे तेलंगणा सरकारने लॉकडाउन पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या आदेशात सरकारने आता राज्यात कोणतेच निर्बंध नसतील, असे जाहीर केले आहे. ही बाब मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केली आहे. हा निर्णय तेलंगणा सरकारच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे.

लॉकडाउन हटवण्याचा निर्णय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानंतर घेण्यात आला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. त्याचबरोबर कोरोना नियंत्रणात असल्याचे सरकारने सांगितले आहे. तेलंगणात शुक्रवारी १ हजार ४१७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख १० हजार ८३४ वर पोहोचली आहे. तर एका दिवसात १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृतांचा आकडा एकूण ३ हजार ५४६ वर पोहोचला आहे.