
बंगळुरु : पुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी रियल टाइम डेटा सिस्टीम महाराष्ट्राने बसवली आहे, पण ही सिस्टीम अद्याप कर्नाटक सरकारने बसवलेली नाही. ही सिस्टीम कर्नाटक प्रशासनाने तातडीने अलमट्टी धरण परिसरात बसवावी अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची अलमट्टी धरणाच्या पाण्याच्या नियंत्रणासंबंधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपन्न झाली. जयंत पाटलांनी ही मागणी या बैठकीत केली.
जयंत पाटलांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे अलमट्टी धरणावर रियल टाईम डेटा सिस्टीम बसवण्याची मागणी
2019 मध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली भागात आलेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून महाराष्ट्र सरकार आधीच हालचाली करत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांची बंगळुरुत भेट घेतली. जलसंपदा खात्याचे प्रमुख अधिकारीही त्यावेळी उपस्थित होते.
पाण्याच्या प्रवाहाची रियल टाइम डेटा सिस्टीममुळे माहिती अचूक मिळते, त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकू, असेही जयंत पाटील म्हणाले. संभाव्य महापुराबाबत कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारचा समन्वय असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही राज्याचे शासन संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सर्व तयारीनिशी समर्थ असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्र राज्याच्या भीमा व कृष्णा खोऱ्यातून सोडला जाणारा विसर्ग व त्याच्या माहितीचे आदान- प्रदान यासाठीची यंत्रणा, दोन्ही राज्याच्या धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली निश्चित करणे, कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणातून पाणी साठवणे व पाणी सोडण्याचे नियोजन, पूर नियंत्रण व व्यवस्थापनासाठी विविध स्तरावरील कार्यपद्धतीची चर्चा व इतर मुद्द्यांबाबत मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि जयंत पाटील यांच्या या भेटीत सविस्तर चर्चा झाली
सांगली, सातारा आणि कोल्हापुरातील अनेक भागांना अलमट्टीतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पूर परिस्थितीला सामोरे जावे लागते. म्हणूनच महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने या पूर नियंत्रणाचे काम करणे आवश्यक आहे. 2019 महाराष्ट्रमध्ये पूर आल्यावर कर्नाटक सरकार पाणी सोडल्यानंतर सांगली कोल्हापूरमधील पाणी ओसरले होते. पण तोपर्यंत या भागात मोठे नुकसान झाले होते.
