शिवप्रसाद काय असतो, ते वैभव नाईकांना विचारा, आमदार नितेश राणेंचा संजय राऊतांना खोचक टोला!


मुंबई – शिवसेना भवनासमोर दोनच दिवसांपूर्वी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. शिवसैनिक भवनासमोर आंदोलन करणाऱ्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना भिडले आणि पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. तशाच स्टाईलचा राडा आज कोकणातील सिंधुदुर्गमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट शिवसेना खासदार संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.

शिवप्रसाद काय असतो, हे संजय राऊतांनी वैभव नाईकांना विचारावे, पोटभर दिला आज, असे नितेश राणे म्हणाले आहेत. संजय राऊतांनी शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यावर केलेल्या शिवप्रसाद आणि शिवभोजन थाळीचा संदर्भ घेऊन केलेल्या विधानावर नितेश राणेंनी हा टोला लगावला आहे.


या मुद्द्यावरून संजय राऊत यांची भाजपा आमदार नितेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे. शिवप्रसाद काय असतो, ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईकांना विचारावे. पोटभर दिला आज आमच्या कार्यकर्त्यांनी. पाहिजे असेल, तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिसमध्ये. टेस्ट आवडेल नक्की!, असे ट्वीट करत नितेश राणेंनी संजय राऊतांना देखील या ट्वीटमध्ये टॅग केलं आहे. राणे बंधूंकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेनेला लक्ष्य केले जात असताना त्यामध्ये नितेश राणेंच्या या नव्या ट्वीटची भर पडली आहे.

शिवसेना आणि राणेसमर्थक भाजप कार्यकर्त्यांमध्ये सिंधुदुर्गमध्ये आज एका पेट्रोलपंपावर राडा झाला. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एका पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल वाटायला सुरुवात केली. हा प्रकार भाजपला पेट्रोल दरवाढीवरून खिजवण्यासाठी केल्याचे बोलले जात होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राणेसमर्थक भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यावेळी आमदार वैभव नाईक देखील त्यामध्ये पडले होते, पण तेवढ्यात पोलिसांनी मध्यस्थी करत हा प्रकार थांबवला.