एम्सच्या प्रमुखांनी वर्तवली येत्या 6 ते 8 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता


नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशात ओसरत असल्यामुळे लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात येत आहेत. लॉकडाऊन अनेक राज्यांनी पूर्णपणे हटवला आहे. याच दरम्यान आज देशातील सर्वात मोठी वैद्यकीय संस्था एम्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, देशात येत्या 6 ते 8 आठवड्यांत पुन्हा कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि या लाटेला थांबवणे अशक्य आहे.

डॉ. रणदीप गुलेरिया यांनी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्याबरोबरच म्हटले की, देशातील मोठ्या लोकसंख्येने लसीकरण करुन अधिकाधिक लोकांना कोरोनापासून सुरक्षित करणे हे देशातील मुख्य आव्हान आहे. तसेच कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवणे योग्य निर्णय आहे, कारण त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना वाचवले जाऊ शकते.

पुढे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यात आला आहे. परिस्थिती पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे. पण लोक अनेक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत, मास्क वापरत नाहीत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाहीत. ज्या पद्धतीने लोक बेजबाबदारपणे वागत आहेत, त्यातून लोक पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून काही शिकले नसल्याचे दिसून येत आहे.

अनलॉक होताच पुन्हा गर्दी वाढत आहे आणि लोक नियमांचे पालन करत नाहीत. पण राष्ट्रीय स्तरावर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्यास थोडा वेळ लागेल. पुढील तिसरी लाट येत्या सहा ते आठ आठवड्यांत येऊ शकते किंवा त्यास थोडा जास्त वेळ लागू शकेल, असे डॉ. रणदीप गुलेरिया यांना सांगितले.

पुढे एम्सच्या प्रमुखांनी सांगितले की, सामान्यत: नवीन लाटे यायला तीन महिने लागू शकतात. परंतु नवीन लाटेला तीनच महिने लागतील हे आवश्यक नसते, कारण वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून खूप कमी वेळेतही हे घडू शकते. आपल्याला कोरोना प्रोटोकॉलशिवाय स्थितीवर काटेकोरपणे पाळत ठेवणे आवश्यक आहे. कारण आधीच्या लाटेत आम्हाला कोरोना व्हायरसचा एक नवीन प्रकार दिसला होता जो परदेशातून आपल्या देशात आला आणि येथे विकसित झाला. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.