या आंब्याचे रक्षण करताहेत चार गार्ड आणि सहा कुत्री

भारतात आंब्याचा सिझन सुरु असतानाचा मध्यप्रदेशच्या जबलपूर येथून एक खास बातमी आली आहे. जगातल्या महाग आंब्याच्या यादीत असलेल्या मियाझाकी जातीच्या आंब्याचे उत्पादन येथे देशात फक्त एकच ठिकाणी घेतले जात असून या झाडाला लागलेल्या आंब्यांच्या रक्षणासाठी ४ गार्ड आणि सहा क्रूर कुत्री तैनात केली गेली आहेत. या आंब्याचा आंतरराष्ट्रीय बाजारातील दर किलोला २ लाख ७० हजार रुपये आहे.

जबलपूरच्या संकल्प परिहार यांच्या बागेत मियाझाकी जातीचे दोन आम्रवृक्ष आहेत. विशेष म्हणजे परिहार यांना काही वर्षापूर्वी या आंब्याबद्दल काहीच माहिती नव्हती. संकल्प यांच्या पत्नी राणी सांगतात, एकदा चेन्नई ला रेल्वे मधून प्रवास करत असताना एका व्यक्तीने त्यांना ही दोन रोपे दिली आणि या झाडाच्या आंब्याची मुलाप्रमाणे काळजी घ्या असे सांगितले.

परिहार यांनी ही झाडे त्यांच्या बागेत लावली. काही वर्षानंतर जेव्हा त्याला फळे धरू लागली तेव्हा त्याचा रंग बघून त्यांना फारच आश्चर्य वाटले. ही फळे डाळिंबाच्या रंगाची होती. त्यांनी या आंब्याचे नामकरण दामिनी असे केले होते. एक फळ ३५० ग्राम वजनाचे येते असेही परिहार म्हणाले. त्यानंतर त्यांनी माहिती काढली तेव्हा हा जपानी मियाझाकी आंबा असल्याचे त्यांना कळले. हा आंबा जगातील महाग आंबा आहे हेही समजले. गेल्या वर्षी लोकांनी बागेतून आंबे चोरून नेले म्हणून यंदा त्यांनी चार गार्ड आणि सहा कुत्री तैनात केली आहेत.

या आंब्याला स्थानिक बाजारात फार भाव नाही. पण यंदा परिहार यांना गुजराथ मधून एक ग्राहक मिळाला असून हा ग्राहक उद्योजक आहे. त्याने एका आंब्यासाठी २१ हजार रुपये देण्याची तयारी दाखविली आहे. या आंब्यात बीटा कॅरोटीन, फोलिक अॅसिड, अँटी ऑक्सिडंटस, मोठ्या प्रमाणात असतात. जपान मध्ये मियासाकी प्रांतात यांचे उत्पादन घेतले जाते त्यामुळे या आंब्याला मियाझाकी असे नाव दिले गेले आहे. ७० ते ८० च्या दशकांपासून या आंब्याचे मोठे उत्पादन घेतले जात आहे.