माही धोनी परिवारासह सिमल्यात दाखल

टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षी, कन्या जीवा आणि परीवारातील अन्य ९ सदस्यांसह हिमाचलची राजधानी आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ सिमला येथे पोहोचला आहे. शुक्रवारी सायंकाळी धोनी येथे पोहोचला असून त्याचा मुक्काम हेवन होम स्टे मध्ये असल्याचे समजते. धोनीची सिमला भेट ही विश्रांती आणि परिवारासह थोडा निवांत वेळ घालविता यावा यासाठी असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यापूर्वी धोनी ऑगस्ट २०१८ मध्ये सिमल्याला आला होता. त्यावेळी जाहिरातीचे शुटींग करण्यासाठी तो येथे आला होता. सिमल्याच्या मॉल रोडवर एका बँकेच्या डिजिटल पेमेंट जाहिरातीचे शुटींग धोनीने केले होते. त्यावेळी त्याने सिमल्याच्या वळणदार रस्त्यातून बाईक रायडिंगच्या आनंद लुटला होता. मात्र धोनीच्या या भेटीवर त्यावेळी टीका झाली होती.

करोना नियम थोडे शिथिल झाल्याने पर्यटक आणि सेलेब्रिटी थंड हवेच्या ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. त्यातही हिमाचल मध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. काही दिवसापूर्वी बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर आईसह येथे आला होता. अनुपम खेर यांचे सिमला येथे घर आहे.