आठवड्यात अदानी यांच्या संपत्तीत १२ अब्ज डॉलर्सची घट

देशातील बडे उद्योजक आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी काही आठवड्यापूर्वी आशियातील दोन नंबरचे श्रीमंत म्हणून मिळविलेले स्थान या आठवड्यात त्यांना गमवावे लागले आहे. या एकच आठवड्यात गौतम अदानी यांच्या संपत्तीत तब्बल १२ अब्ज डॉलर्सची घट आली आहे. शेअर बाजारात अदानी कंपन्यांचे शेअर घसरल्याने ही घट आली आहे.

मे मध्येच अदानी यांनी आशियातील दुसरे श्रीमंत उद्योजक म्हणून स्थान मिळविताना चीनच्या झोंग शानझान यांना मागे टाकले होते. फोर्ब्स रियल टाईम बिलीनेअर इंडेक्स नुसार या आठवड्याच्या सुरवातीला अदानी यांची संपत्ती ७४.९ अब्ज डॉलर्स वरून ६२.७ अब्ज डॉलर्सवर आली आहे. रिलायंसचे मुकेश अंबानी यांची संपत्ती ८६.६ अब्ज डॉलर्स असून चीनच्या फार्मा मॅग्नेटचे झोंग शानझान यांची संपत्ती ६८.९ अब्ज डॉलर्स आहे. त्यांनी यादीतील आपले दुसरे स्थान पुन्हा मिळविले आहे.

या आठवड्यात अदानी एंटरप्रायझेस, पॉवर, टोटल गॅस, ट्रान्समिशन, पोर्ट्स, ग्रीन या कंपन्याचे शेअर्स घसरले आहेत. एफपीआय मालकी रिपोर्ट आल्यावर सोमवार पासून अदानी समूहाच्या शेअर मध्ये घसरण सुरु झाली आहे.