कोल्हापुरातील निर्बंध 27 जूनपर्यंत कायम राहण्याची शक्यता


कोल्हापूर : राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्यामुळे तिथे लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात होत असून तेथील व्यवहारही सुरळीत सुरु झाले आहेत. परंतु, कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती अद्यापही चिंताजनक असल्याची पाहायला मिळत आहे. जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची व्यापलेली संख्या याचे प्रमाण या आठवड्यात देखील कमी झालेले नाही. म्हणून कोल्हापूर जिल्हा चौथ्या श्रेणीतच राहिला आहे. यामुळे आता 27 जूनपर्यंत कोल्हापुरातील निर्बंध कायम राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढच होत आहे. तसेच शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक आहे. काही गावामध्ये कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. या सर्व परिस्थितीवरून कोल्हापूर जिल्ह्यातील निर्बंध पुढील आठवड्यातही अर्थात 21 जून ते 27 जून अखेरपर्यंत लागू राहण्याची शक्यता आहे.