महाराष्ट्र परिचय केंद्रामुळे राजधानीत महाराष्ट्राची नवी ओळख – नरहरी झिरवाळ


नवी दिल्ली : विविध राज्यांतील जनतेला व महाराष्ट्रातील व्यक्तींना राजधानीत उपयोगी ठरणारे महाराष्ट्र परिचय केंद्र हे राजधानी दिल्लीत महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करीत असल्याचे मत महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले.

झिरवाळ यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान झिरवाळ बोलत होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर यावेळी उपस्थित होत्या.

झिरवाळ म्हणाले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापना करून महत्त्वपूर्ण कार्य केले. चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या या कार्यालयाचे महत्त्व आजही कायम आहे. या केंद्राच्या माध्यमातून राजधानीत महाराष्ट्र शासनाचे विविध उपक्रम राबविणे, मराठी संस्कृतीचे संवर्धन करणे आदी महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याचे समाधान व्यक्त केले. नवमाध्यमांच्या युगात परिचय केंद्रानेही आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे कार्य उत्तम प्रकारे करीत असल्याचे पाहून त्यांनी या उपक्रमांचे कौतुक केले.

कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशित करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती झिरवाळ यांना दिली. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामाबद्दल झिरवाळ यांनी समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.