मुंबईच्या डबेवाल्यांसाठी HSBC बँक देणार १५ कोटींची मदत


मुंबई: मुंबईच्या डबेवाल्यांची कोरोना संकटाच्या काळात अवस्था बिकट झाली असून डबेवाल्यांना या संकट काळात मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. डबेवाल्यांची संख्याही गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे सांगितले जात आहे. अशातच डबेवाल्यांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. याचदरम्यान आता एक परदेशी बँक मुंबईच्या डबेवाल्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावली असून, या बँकेने डबेवाल्यांना १५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे.

डबेवाल्यांना १५ कोटी रुपयांची मदत करणार असल्याचे HSBC बँकेने जाहीर केले आहे. यामुळे डबेवाल्यांना विमा, रेशन, नव्या सायकली आणि कुटुंबांसाठी आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात बहुतांश ऑफिसेस बंद असल्यामुळे त्याचा थेट परिणाम मुंबईच्या डबेवाल्यांच्या व्यवसायावर झाला आहे. अनेक ठिकाणचे व्यवसाय बंद झाले आहेत. यामुळे मुंबईचा डबेवाला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. यातच HSBC बँकेने जाहीर केलेली मदत त्यांच्यासाठी उपयोगी ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनाच्या परिणामांचा मॅनेजमेंट गुरू म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या डबेवाल्यांनाही सामना करावा लागत असून, शाळा, महाविद्यालये, काही कार्यालये, दुकाने, मॉल्स बंद असल्याने डबे पोहचविण्याच्या सेवेवर ५० टक्के परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्यास ही सेवा काही काळ बंद ठेवण्याची वेळ डबेवाल्यांवर आली आहे. ५० टक्के उपस्थिती काही कार्यालयांमध्ये आहे. उपस्थित कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण डबेवाल्यांकडून येत असलेल्या डब्यांवर विसंबून असल्यामुळे नेहमीप्रमाणे डबे पोहचविण्याचे काम डबेवाला करत असले तरी कमी कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्या सेवेवरही ५० टक्के परिणाम झाला आहे.

दरम्यान, दररोज डबेवाल्यांवर विसंबून असलेल्या चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी डबेवालेही घेत असल्यामुळे दररोज मास्क लावणे, डबे पोहचवित असताना स्वच्छता ठेवणे, जेवण वेळेत कार्यालयात पोहोचविणे आदी खबरदारी घेतली जात आहे.