कोरोना लसीमुळे पहिल्या मृत्यू प्रकरणानंतर केंद्र सरकारची लसीबाबत मोठी माहिती


नवी दिल्ली : अद्यापही देशातील लोकांच्या मनात कोरोना लसीबाबत काही प्रश्न, भीती कायम आहे. अशातच देशात तीन दिवसांपूर्वीच कोरोना लसीमुळे पहिला मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर आता कोरोना लसीबाबत मोदी सरकारने मोठी माहिती दिली आहेत. सरकारने कोरोना लसीमुळे मृत्यू झाल्याचे मान्य केल्यानंतर चौथ्या दिवशी केंद्र सरकारने कोरोना लसीबाबत एक अहवाल जारी केला आहे.

भारतात सर्वात आधी कोरोना लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अभ्यासाचा अहवाल समोर आला आहे. कोरोना लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू झाली. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी कोरोना लस देण्यात आली. ही लस ज्यांना देण्यात आली त्यांचा अभ्यास करण्यात आला. कोरोना लस हजारोंसाठी संजीवनी ठरली असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाल्याच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

याबाबत माहिती देताना नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितले, आरोग्य कर्मचाऱ्यांनाबाबतचा जो अभ्यासाचा अहवाल समोर आला आहे. हे लोक संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेल्या ठिकाणी असतात. अभ्यासानुसार कोरोना लस घेतल्यानंतर इन्फेक्शन झाले तरी 75 ते 80 टक्के रुग्णालयात जाण्याची गरज पडत नाही. ऑक्सिजनची गरज फक्त 8 टक्के भासते. आयसीयूमध्ये जाण्याची वेळ फक्त 6 टक्केच असते. कोरोना लसीकरणाचा हा डेटा सांगतो की कोरोना लस हजारो लोकांचा जीव वाचवतो आहे. त्यामुळे कोरोना लस घ्या, ही खूप गरजेची आहे, असे आवाहन व्ही. के. पॉल यांनी केले आहे.