३२ वर्षांच्या करियर मध्ये सलमान खान प्रथमच करणार बायोपिक

बॉलीवूडचा दबंग खान म्हणजे सल्लू भैय्या त्याच्या ३२ वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत प्रथमच बायोपिक मध्ये काम करणार आहे. सलमानने आत्तापर्यंत कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन, रोमँटिक अश्या अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र कुणा व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपटात तो प्रथम काम करत आहे. दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांच्या आगामी चित्रपटात सलमान ‘ब्लॅक टायगर’ नावाने भारतीय गुप्तहेर इतिहासात प्रसिद्ध असलेल्या गुप्तहेर रविंद्र कौशिक यांची भूमिका करणार आहे.

पिंकव्हिला रिपोर्ट नुसार हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. भारतीय इतिहासातील ही अविश्वसनीय पण सत्यकथा आहे. रविंद्र कौशिक यांची ओळख सर्वश्रेष्ठ गुप्तहेर अशी आहे. राजकुमार यांनी गेली पाच वर्षे रिसर्च करून चित्रपटाची पटकथा तयार केली आहे. भारतीय गुप्तहेर इतिहासात आश्चर्यकारक अश्या ज्या कथा आहेत त्यातील ही एक आहे.

सलमान, टायगर ३ चे शुटींग लवकरच सुरु करत आहे. त्यानंतर तो कभी ईद कभी दिवालीचे शुटींग करणार आहे आणि त्यानंतर या चित्रपटाचे शुटींग सुरु होईल असे समजते.