सॅन फ्रान्सिस्को बनलेय चोरट्यांसाठी स्वर्ग

अमेरिकेतील समृद्ध राज्य अशी ओळख असलेल्या कॅलिफोर्नियाच्या सॅन फ्रान्सिस्को शहरात सध्या वेगळीच परिस्थिती निर्माण झाली असून हे शहर चोरट्यांसाठी जणू स्वर्ग ठरले आहे. पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या या शहरात रिटेल दुकानातून होणाऱ्या चोऱ्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे रिटेल क्षेत्रातील कंपन्यांची परिस्थिती खराब झाली आहे. त्यातही वॉलग्रींस स्टोरला चोरट्यांचा सर्वाधिक फटका बसल्याने त्यांना १७ स्टोर्स बंद करण्याची पाळी आली आहे.

जगभरात करोना मुळे आर्थिक मंदीचे वातावरण आहे आणि त्याने विविध देशात रोजगार, व्यापार क्षेत्रापुढे मोठी आव्हाने निर्माण केली आहेत. याला महासत्ता अमेरिकाही अपवाद नाही. सॅनफ्रान्सिस्कोच्या वॉलग्रींस स्टोर्स मधून चोरटे बॅगा भरून सामान उचलून नेत असल्याचे व्हिडीओ वेगाने व्हायरल झाले आहेत. दुकानातील कर्मचारी शांत उभे राहून चोरटे सामान भरून नेताना पाहताना यात दिसत आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना चोरांशी पंगा घेऊ नये असे आदेश दिल्याचेही समजते. अन्यथा चोर कर्मचाऱ्यांना जखमी करतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. स्टोर उघडले की चोऱ्या आणि बंद ठेवले की ग्राहकांची गैरसोय अश्या कात्रीत ही स्टोर्स सापडली आहेत.

अश्या घटना घडण्यामागे शहरात लागू केलेले काही नियम कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. २०१४ मध्ये येथे ९५० डॉलर्स पेक्षा कमी किमतीच्या सामानाची चोरी हा छोटा अपराध मानला जाईल असा नियम केला गेला आहे. त्यामुळे हा गंभीर गुन्हा ठरत नाही. त्यात करोना मुळे बेरोजगारी वाढल्याने चोऱ्या करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे असेही समजते.