जगातला तिसरा मोठा हिरा गवसला

आफ्रिकेतील हिऱ्याचे नंदनवन अशी ओळख असलेल्या बोत्सवाना मध्ये जगातील तीन नंबरचा मोठा हिरा सापडल्याचा दावा केला गेला आहे. या हिऱ्याचे वजन १०९८ कॅरेट असून बुधवारी राष्ट्रपती मोकग्वीत्सी यांच्यापुढे हा हिरा सादर केला गेला. या महिन्याच्या सुरवातीला वानेंग खाणीत हा हिरा मिळाला असल्याचे सांगितले जात आहे.

या खाणीचे अधिकार सरकार, हिरा कंपनी देब्सवाना आणि डी बियर्स ग्रुप यांच्याकडे आहेत. बोत्सवाना येथील खाणीत मोठ्या प्रमाणावर हिरे सापडतात आणि त्यामुळे याला हिऱ्याचे नंदनवन म्हटले जाते. जगातील सर्वात मोठा हिरा आफ्रिकेतील खाणीत १९०५ साली मिळाला होता. या हिऱ्याचे वजन होते ३१०६ कॅरेट. त्यानंतर २०१५ मध्ये बोत्सवाना येथील खाणीतच ११०९ कॅरेटचा हिरा मिळाला होता. नुकत्याच सापडलेल्या हिऱ्याचे बाजार मूल्य अजून केले गेले नसल्याचे सांगितले जात आहे.