शिवसेना भवनावर चाल करण्याचा प्रयत्न केल्यावर शिवसैनिक आणि मराठी माणूस गप्प बसेल का? : संजय राऊत


मुंबई : राम मंदिरासंदर्भात ‘सामना’त केलेल्या टीकेवर मुंबईत बुधवारी (16 जून) भाजपने शिवसेना भवनासमोर निषेध आंदोलन केलं. त्यावेळी शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथे जमले आणि दोन्ही गटात तुफान राडा झाला. यावर प्रतिक्रिया विचारली असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रसाद मिळणारच, असे म्हटले आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना भवनाकडे जेव्हा जेव्हा वाकड्या नजरेने पाहिले गेले, तेव्हा तेव्हा अशाप्रकारचा राडा झाला आहे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक आहे. बाळासाहेब ठाकरे यांची ती वास्तू आहे. त्याच्यावर चाल करण्याचा प्रयत्न केल्यावर शिवसैनिक आणि मराठी माणूस गप्प बसेल का? शिवसेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रसाद मिळणारच हे मी ऑन रेकॉर्ड सांगतो.

राम मंदिरासाठी जमीन खरेदीत घोटाळ्याचा आरोप झाला आहे. जर ते आरोप राम मंदिराबाबत बदनामीसाठी केले असतील, तर त्यांच्यावरही कारवाई करा, असे ‘सामना’च्या अग्रलेखातून स्पष्ट म्हटले आहे. भाजपवर थेट आरोप केलेला नाही. मग ही टीका भाजपला का झोंबली? राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यास ही स्वायत्त संस्था आहे, त्यात भाजपचे कार्यकर्ते आहेत का? श्रद्धेच्या वास्तूबाबत खुलासा विचारणे हा गुन्हा झाला का? असे सवाल संजय राऊत यांनी विचारले. तसेच काल हा हल्ला करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. आमच्याकडून विषय संपलेला असल्याचेही त्यांनी म्हटले.