नाशिक महानगरपालिकेची परिवहन सेवा एक जुलैपासून होणार सुरु


नाशिक : नाशिक महानगर पालिका जे एस टी महामंडळाला जमले नाही ते करणार आहे. नाशिक महानगरपालिकेची परिवहन बस सेवा एक जुलैपासून सुरू होणार आहे. आता चकचकीत बसेस नाशिकच्या रस्त्यावर धावणार आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या बस सेवेला अनेक अडचणी, आव्हानांचा सामना करत मुहूर्त मिळला आहे.

भाजपची सत्ता नाशिक महानगरपलिकेत येण्याआधी शेवटच्या प्रचारसभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती. या घोषणेनतर नाशिककरांनी भाजपच्या परड्यात भरभरून दान टाकले. भाजपला एकहाती सत्ता दिली. नाशिक दत्तक घेतनाच देवेंद्र फडणवीस यांनी महानगर पालिकेच्या माध्यमातून परिवहन बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती.

एस टी महामंडळाला शहर वाहतूक सेवा परवडत नाही, ती महापालिकेला कशी परवडणार असा सवाल उपस्थित करत विरोधकानी बससेवेला कडाडून विरोध केला. पण सत्ताधारी भाजपने विरोध हाणून पाडत प्रकल्प दामटून नेण्यास सुरवात केली. अखेर एक जुलैचा मुहूर्त साधत मनपाची परिवहन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

नव्या बसेसचे ट्रायल रन शहरात 27 जून पासून होणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 डिझेल बस धावणार आहेत. टप्प्याटप्प्याने नाशिकच्या रस्त्यावर सीएनजी आणि इलेक्ट्रिकल बस धावणार आहेत. नाशिक शहराच्या हद्द बाहेर गेल्या काही महिन्यांपासून या बस अक्षरक्षा: पडून आहेत. एकाच ठिकाणी उभ्या राहिल्यामुळे बस खराब होत आहेत. त्यामुळे रोज त्यांचा मेंटेनन्स करावा लागत आहे. रोज सकाळी बस दहा ते पंधरा मिनिटे सुरू ठेवाव्या लागतात. बरेच दिवस बस सुरू झाल्या नाहीत, तर अनेकांची बॅटरी डिस्चार्ज होतात, टायरमधील हवा कमी होते, त्यामुळे याबाबत देखभाल रोज ठेवावी लागत आहे.

सध्या तपोवनात बस डेपो उभरण्याचे काम सुरू झाले आहे. सुरवातीला तपोवन ते नाशिकरोड, तपोवन ते पवन नगर, पंचवटी ते सातपूर, नाशिककरोड ते अंबड आशा महत्वाच्या नऊ मार्गावर बस धावणार आहेत. बस चालक-वाहकांची जबाबदारी बससेवा पुरविणाऱ्या कंपनीची आहे. त्यामुळे नोकरभरतीचा बोजा महापालिकेवर पडणार नसल्याचा दावा मनपा प्रशासन करत आहे. किलोमीटरप्रमाणे मनपाला बिल अदा करायचे आहे. सीटी बस कसारा, ओझरपर्यंत धावणार असून नाशिक दर्शन, सुला वाईन, बोट क्लबची सफर ही केली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

5 वर्षापासून एसटी महामंडळाने टप्प्याटप्याने बस सेवा बंद करण्यास सुरवात केली. पाच वर्षापूर्वी साधारण सव्वा दोनशे बसच्या माध्यमातून 20 हजार प्रवासीची वाहतूक केली जात होती. तेव्हा दीड ते दोन कोटी रुपयांचा तोटा महामंडळाला सहन कारव लागत होता. मागील वर्षापर्यंत बस फेऱ्या 100 पर्यंत आणण्यात आल्या.

मार्च 2020 पासून तर पूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. नाशिक मनपाला महामंडळाकडून ना हरकत दाखलाही देण्यात आला आहे. त्यामुळे शहर बस वाहतुकीतून एस टी महामंडळ मुक्त झाले आहे. येथील बस आणि कर्मचारी ग्रामीण भागात वर्ग करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक राजेंद्रकुमार पाटील यांनी दिली.

महाराष्ट्रातील अनेक शहरात महानगरपालिकेकडून सुरू असणाऱ्या बस सेवा तोट्यात आहेत. एकीकडे नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी कर्ज काढण्याचे प्रस्ताव सत्ताधारी पक्षाकडून ठेवला जात असताना दुसरीकडे हा पांढरा हत्ती कसा पोसणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे.