वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी बीसीसीआयने जाहीर केली प्लेइंग इलेव्हनची घोषणा


नवी दिल्ली – भारत आणि न्यूझीलंडमध्ये उद्यापासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारताकडून या सामन्यामध्ये कोणत्या ११ खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल, याविषयी बरीच चर्चा सुरू होती. अखेर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा बीसीसीआयने केली आहे. यामध्ये अपेक्षेप्रमाणे रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला असून संघाबाहेरमोहम्मद सिराजला ठेवण्यात आलं आहे. उद्यापासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरु होत असून भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने आहेत. हा सामना इंग्लंडच्या साउथँप्टनमधील एजियास बाउल मैदानात रंगणार आहे.

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन बीसीसीआयने जाहीर केलेली पुढीलप्रमाणे:

  • विराट कोहली (कर्णधार)
  • अजिंक्य रहाणे (उपकर्णधार)
  • रोहित शर्मा
  • शुभमन गिल
  • चेतेश्वर पुजारा
  • ऋषभ पंत
  • रविचंद्रन अश्विन
  • रविंद्र जाडेजा
  • जसप्रीत बुमराह
  • इशांत शर्मा
  • मोहम्मद शमी

बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या संघानुसार रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी आघाडीला मैदानात उतरेल. तर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी येईल. त्यानंतर कर्णधार विराट कोहली, पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे, सहाव्या क्रमांकावर ऋषभ पंत, सातव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा, आठव्या क्रमांकावर आर. अश्विन, नवव्या क्रमांकावर मोहम्मद शमी, दहाव्या क्रमांकावर इशांत शर्मा आणि अकराव्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह असेल. या संघात स्थान मोहम्मद सिराजला देण्यासाठी कर्णधार विराट कोहली आणि संघ प्रशासन आग्रही होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र त्याला संघात स्थान मिळालेले नाही.