२० डॉलर्स मूल्याच्या सोन्याच्या नाण्याला लिलावात मिळाले १८९ लाख डॉलर्स

अमेरिकेत न्युयॉर्क येथे सोथबी या लिलाव संस्थेने केलेल्या एका लिलावात २० डॉलर मूल्याच्या सोन्याच्या एका नाण्याला १८९ लाख म्हणजे १३८ कोटी रुपयांची बोली लागली, याच लिलावात एक दुर्मिळ तिकीट सुद्धा ६० कोटी रुपयांना विकले गेले.

हे सोन्याचे नाणे १९३३ साली बनलेले आहे. त्यावर दोनही बाजूला गरुड असून त्याला डबल इगल कॉइन म्हटले जाते. या नाण्याच्या एका बाजूला स्वातंत्रदेवतेची पुढे जात असलेली प्रतिमा आहे. हे नाणे शु डिझायनर आणि संग्राहक स्टूअर्ट वित्जमन यांनी २००२ साली ५५ कोटी रुपयात खरेदी केले होते आणि ते त्यांच्या खासगी मालकीचे होते.

लिलावात या नाण्याला ७३ ते १०० कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्षात ते १३८ कोटींना विकले गेले. खरेदीदराचे नाव त्याच्या इच्छेप्रमाणे गुप्त ठेवले गेले आहे. या नाण्याला इतकी किंमत मिळण्याचे कारण म्हणजे संयुक्त राज्य अमेरिका अस्तित्वात आली तेव्हाचे हे शेवटचे सोन्याचे नाणे आहे. ज्या व्यक्तीने हे नाणे खरेदी केले त्यानेच १८५६ साली जारी केले गेलेले ब्रिटीश गयाना मजेंटा हे दुर्मिळ तिकीट ६० कोटींना खरेदी केले असे समजते.