रोनाल्डोच्या रागामुळे कोकाकोलाला २९३ अब्ज रुपयांचा फटका

पोर्तुगालचा आक्रमक स्टार स्ट्रायकर क्रिस्तियानो रोनाल्डोने पत्रकार परिषदेत टेबलवर कोलाकोलाच्या बाटल्या पाहून व्यक्त केलेला संताप कोकाकोला कंपनीला २९३ अब्ज रुपयांना पडला असल्यचे समजते. हंगेरी विरुद्ध पोर्तुगाल टीमच्या युरो २०२० सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत हा प्रकार घडला होता.

रोनाल्डो पत्रकार परिषदेत आला आणि टेबलवर ठेवलेल्या कोकाकोलाच्या बाटल्या पाहून संतापला. जोरात ओरडून त्याने शीत पेये नको, पाणी प्यायची सवय लावून घ्या असे सांगितले मात्र कोकाकोलाचा शेअर कोसळला. सोमवारी युरोप मध्ये ३ वा. शेअरबाजार उघडला तेव्हा कोका कोलाचा शेअर ५६.१० अमेरिकी डॉलरवर होता. पण रोनाल्डोच्या वक्तव्यामुळे कोकाकोला विरुद्ध वातावरण तयार झाल्याने त्याचा परिणाम शेअरची घसरण होण्यात झाला. शेअरबाजार उघडल्यावर थोड्याच वेळात हा शेअर ५५.२२ डॉलरवर आला. याचा परिणाम कंपनीचे बाजारमूल्य ४ अब्ज डॉलर्सने घटण्यात झाला.

वास्तविक युरो २०२० स्पर्धा ११ देशात खेळली जात असून कोकाकोला त्याचा अधिकृत प्रायोजक आहे. कंपनीने ब्रांड व्हॅल्यु वाढविण्यासाठी कोकाकोलाच्या बाटल्या डिस्प्ले केल्या होत्या. मात्र रोनाल्डो फिटनेस साठी कोणत्याही शीतपेयाचे सेवन करत नाही. त्यामुळे या बाटल्या पाहून तो संतापला होता. कंपनीने रोनाल्डोच्या या वर्तणुकीवर प्रतिक्रिया देताना,’ प्रत्येकाला त्याचा स्वाद आणि गरजेनुसार ड्रिंक निवडण्याचे स्वातंत्र आहे’ असे म्हटले आहे.