जगन्नाथ पुरी मंदिराचे दरवाजे चांदीने सजणार

देशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान ओरिसा मधील जगन्नाथ पुरी मंदिर येत्या २५ जुलै पासून भाविकांना दर्शनासाठी खुले होणार असल्याचे बातमी आहे. मंदिर प्रशासनाच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीतून मिळालेल्या माहितीनुसार मंदिराचे तीन मुख्य दरवाजे चांदीने सजणार आहेत. एका भाविकाने दान दिलेल्या २ टन म्हणजे २ हजार किलो चांदीतून अतिशय सुरेख नक्षी कोरलेले पत्रे तयार करून ते या दरवाजांवर बसविले जाणार आहेत.

करोना मुळे मंदिर १५ जून पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद होते पण करोना प्रकोप जारी राहिल्याने २५ जुलै पर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला गेला होता. यंदा १२ जुलै पासून जगप्रसिद्ध जगन्नाथ यात्रा सुरु होत आहे आणि ती ९ दिवस चालणार आहे. गतवर्षी प्रमाणे यंदाही ही यात्रा भाविकांच्या शिवाय पार पडत आहे. सुरक्षा रक्षक आणि सेवेकरी या यात्रेत सामील होणार असून त्या सर्वाना लसीचे दोन डोस घेतले असणे बंधनकारक केले गेले आहे. अथवा त्यांना करोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. करोना संदर्भातले सर्व नियम पाळून रथयात्रा काढली जाणार आहे असे समजते.

यात्रा २३ जुलै रोजी संपणार आहे. त्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेतली जाणार आहे. मगच २५ जुलै पासून भाविकांना भगवान बलराम, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांचे दर्शन मिळणार का नाही याचा निर्णय होणार आहे.