चीनी वस्तूंवर बहिष्कार तरी व्यापारात वाढ

भारतचीन सीमेवर सातत्याने होत असलेल्या हालचाली, चकमकी मुळे निषेध म्हणून भारत सरकारने अनेक चीनी अॅपवर बंदी घातली आणि गुंतवणुकीवर अनेक निर्बंध आणले असूनही वर्षाच्या सुरवातीच्या पाच महिन्यात दोन्ही देशांच्या व्यापारात वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. २०२१ च्या पहिल्या पाच महिन्यात वार्षिक व्यापार सरासरीच्या तुलनेत ही वाढ ७० टक्के असल्याचे समजते.

या संदर्भात एक सर्व्हेक्षण केले गेले होते त्यात गेल्या १ वर्षात ४३ टक्के भारतीयांनी एकाही चीनी वस्तू खरेदी केली नसल्याचे दिसून आले होते. तरीही झालेल्या या व्यापारवाढीमागे कोणती कारणे आहेत हे तपासले गेले तेव्हा कोविड विरुध्दच्या लढाईला वेग यावा यासाठी भारतीय कंपन्यांनी चीन मधून मेडिकल उपकरणे आणि वैद्यकीय सामान मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याचे दिसून आले. या वर्षात चीन आणि भारत याच्यातील व्यापार ४८.१६ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.

भारतात चीनी निर्यातीत जानेवारी ते मे या काळात वार्षिक सरासरीच्या ६४.१ टक्के वाढ झाली. केलेल्या सर्व्हेक्षणात असे दिसून आले होते की ४३ टक्के भारतीयांनी गेल्या एक वर्षात मेड इन चायना एकही वस्तू खरेदी केलेली नाही, ३४ टक्के लोकांनी १ किंवा दोन चीनी उत्पादने खरेदी केली, ८ टक्के ग्राहकांनी ३ ते ५ चीनी उत्पादने तर ३ टक्के लोकांनी १० ते १५ व १ टक्के ग्राहकांनी २० किंवा त्याहून अधिक चीनी उत्पादने गेल्या वर्षात खरेदी केली आहेत.