राम मंदिरावरील टीकेवरुन शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा


मुंबई – मुंबईत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला असून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनसमोर जबरदस्त हाणामारी झाली आहे. शिवसेनेकडून राम मंदिरावरुन करण्यात आलेल्या टीकेमुळे हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान परिसरातील वाहतूक हाणामारीमुळे विस्कळीत झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेकडून यावरुन टीका करण्यात आली होती. शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेविरोधात शिवसेना भवनच्या बाहेर भाजप जनता युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले. दरम्यान शिवसेना भवनच्या बाहेर भाजपचे आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक कार्यकर्ते तिथे दाखल झाले. यादरम्यान शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले आणि तुफान हाणामारी झाली.


पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी भाजप जनता युवा मोर्चाच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. शिवसेनेच्याही काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. दरम्यान भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसैनिक शिवेसना भवनमध्ये जमले होते. भाजपचे काही कार्यकर्ते दगडफेक करणार असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. यामुळे शिवसैनिकांनी त्यांना थाबवले, असता बाचाबाची झाल्याची माहिती स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. शिवसेना भवनवर कोणी चाल करणार असेल तर प्रतिकार करणार हेच शिवसैनिकांना माहिती असून त्यांनी तेच केल्याचे त्यांनी म्हटले.