न्यूझीलंडच्या सदस्यांनी बायो-बबलचे नियम मोडल्या प्रकरणी आयसीसीकडे तक्रार करणार बीसीसीआय


साउथॅम्पटन – टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघ आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी सज्ज झाला असून हा सामना १८ जून ते २२ जून दरम्यान इंग्लंडच्या साउथॅम्पटन मैदानात खेळला जाणार आहे. तत्पूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता दोन्ही संघाचे खेळाडू बायो-बबलमध्ये सराव करत आहे. साउथॅम्पटनमधील एका हॉटेलमध्ये दोन्ही संघाचे खेळाडू वास्तव्यास आहेत. पण न्यूझीलंडच्या सदस्यांनी अंतिम सामन्यापूर्वी बायो-बबलचे नियम मोडल्याप्रकरणी आयसीसीकडे बीसीसीआय तक्रार दाखल करणार आहे.

बायो बबलचे नियम धाब्यावर बसवून न्यूझीलंडचे काही खेळाडू सकाळी गोल्फ खेळण्यासाठी गेले होते. यामुळे भारतीय संघ प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे, अशी बातमी क्रिक बजने दिली आहे. बीसीसीआय याची तक्रार थेट आयसीसीकडे करणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. या खेळाडूंमद्ये ट्रेंट बोल्ट, टिम साउदी, हेनरी निकोल्स, मिशेल सेंटनर, डेरिल मिशेल आणि फिजिओ टॉमी सिमसेक यांचा समावेश आहे. गोल्फ खेळण्यासाठी हे सहा जण सकाळी गेले होते.

दरम्यान न्यूझीलंड संघ प्रशासनाने कोणताही प्रोटोकॉल तोडला नसल्याचा दावा केला आहे. न्यूझीलंड संघ प्रशासनाकडून हॉटेल आणि गोल्फ मैदान एकाच भागात असल्याचे कारण देण्यात आले आहे. दुसरीकडे दोन्ही संघासाठी आयसीसीने समान नियमावली ठेवावी, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.