कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंच्या नेतृत्त्वात मूक आंदोलनाला सुरुवात


कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून कोल्हापुरातून मूक आंदोलनाची सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन पार पडणार आहे. या आंदोलनात प्रकाश आंबेडकर, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटीलही सहभागी होणार आहेत.

राज्यभरातील मराठा समन्वयक आंदोलनात सहभागी होत आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर आहेत. तसंच कोल्हापुरातील आमदार, खासदारांनीही मूक मोर्चाला उपस्थिती लावली आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांची कोल्हापुरातील आंदोलनस्थळी भेट झाली. यावेळी चंद्रकांत पाटलांकडून संभाजीराजेंना पाठिंब्याचे पत्र सुपूर्द करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजेंवर सातत्याने टिप्पणी केली जात होती. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे जे आंदोलन करतील त्यांना पाठिंबा देणार, आज कोल्हापूरचा नागरिक आंदोलनात सहभागी झालो आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

कोल्हापुरातील आंदोलन स्थळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर दाखल झाले आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या मूक मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी ते कोल्हापुरात पोहोचले आहेत. त्याचबरोबर खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलन ठिकाणी दाखल झाले आहेत. मराठा समाजासाठी कोणत्याही परिस्थितीत असलो तरी उपस्थित राहणार अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. दरम्यान धैर्यशील माने नुकतेच कोरोना निगेटिव्ह झाले आहेत

कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनाला राज्यभरातून समन्वयक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनाला येणाऱ्या प्रत्येक समन्वयकाची नोंद कोल्हापूर पोलिसांनी ठेवली आहे. कोरोना संकटाचे सर्व नियम पाळून आंदोलन व्हावे, असे आवाहन देखील कोल्हापूर पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.