मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगतापांविरोधात आमदाराने केली पक्षश्रेष्ठीकडे तक्रार


मुंबई – पंजाब आणि राजस्थानात सुरु असलेले बंड शांत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेससमोर आणखी एक नवीन संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जशजशा मुबंई महानगरपालिकेच्या निवडणुका हळूहळू जवळ येत आहेत, तसतशी मुंबई काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर येत आहे. थेट मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरुद्ध पक्षश्रेष्ठीकडे काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी तक्रार केली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पत्र लिहून आमदार सिद्दीकी यांनी भाई जगतापांविषयी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्षांबरोबर काँग्रेसही लागली आहे. पण आता काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आला आहे. काँग्रेस आमदार सिद्दीकी यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात तक्रार केली असून, त्यांनी जगतापांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप सिद्दीकी यांनी केली आहे. माझ्याविरोधात माझ्या पक्षाचा अध्यक्षच कारवाया करत आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने माझ्या मतदारसंघात कार्यक्रम घेण्यात आला, पण स्थानिक आमदार असूनही आपल्याला बोलावले गेले नाही. आपल्या (झिशान सिद्दीकी) उमेदवाराला मुंबई युवा काँग्रेस निवडणुकीत मदत केल्यास पक्षात पद देणार नसल्याचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांना भाई जगताप यांनी सांगितल्याचा आरोप झिशान सिद्दीकी यांनी केला आहे.

मुंबई काँग्रेसच्या वतीने काही दिवसांपूर्वी बीकेसी पोलीस ठाण्यात पोलिसांना कोरोना संबंधित आवश्यक साधनसामुग्री वाटप करण्यात आली होती. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना देखील त्या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले होते. पण स्थानिक आपण आमदार असून, आपल्याला बोलवण्यात आले नाही. प्रोटोकॉल पाळले जात नाहीत. पक्षात माझ्याविरुद्ध काम करणाऱ्यांना ताकद दिली जात असल्याचे सिद्दीकी यांनी म्हटले आहे.

आमदार सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केल्याच्या वृत्तावर बोलताना भाई जगताप म्हणले, नेमके काय प्रकरण हे त्यालाच विचारा. प्रत्येकाला काँग्रेसमध्ये विचार मांडण्याचा अधिकार आहे. आमच्या पक्षात लोकशाही आहे. सोनिया गांधी असो किंवा राहुल गांधी असो त्यांच्याकडे विचार मांडण्याचा अधिकार आहे. मुंबईत आमचे चार आमदार आहेत. त्यापैकी झिशान सिद्दीकी सर्वात तरुण आमदार आहे. त्याचा उत्साह मी समजू शकतो.

त्याचे जितके वय आहे, त्यापेक्षा जास्त काळ मी राजकारणात आहे आणि फक्त आणि फक्त काँग्रेसमध्ये. त्यामुळे माझी कारकीर्द, कामकाजाची पद्धत नेत्यांना माहिती आहे. मी जाणीवपूर्वक अध्यक्ष म्हणून वेगळी वागणूक कुणाला देत नाही. ज्यावेळी अपेक्षा व्यक्त केल्या जातात. प्रोटोकॉल असेल, तर तो झिशान सिद्दीकीलाही लागू होतो आणि भाई जगतापलाही लागू होतो. झिशान सिद्दीकीशी मी चर्चा करुन, नाराजीबद्दल मार्ग काढेन, असे भाई जगताप यांनी म्हटले आहे.