विमानवाहू युद्धनौकेलाही सहा फुटांपर्यंत उचलण्याची ताकद या जगातील सर्वात शक्तिशाली चुंबकात


नवी दिल्ली – जगभरातील अनेक देश पारंपारिक ऊर्जा साधनांवरील भार कमी करुन स्वच्छ आणि पर्यावरणपुरक मार्गाने ऊर्जानिर्मिती करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशाच एका प्रयत्नामध्ये जगातील सर्वात शक्तीशाली चुंबक फ्रान्सने तयार केले आहे. हे चुंबक फ्युजन रिअ‍ॅक्टरसाठी तयार करण्यात आले आहे. ज्या पद्धतीने सूर्य ऊर्जा निर्माण करतो त्याच पद्धतीने या चुंबकाचा वापर ऊर्जानिर्मितीसाठी केला जाणार आहे.

हे चुंबक इंटरनॅशनल थर्मोमॉलिक्युलर एक्सपिरिमेंटल रिअ‍ॅक्टर (आयटीईआर) या जागातिक स्तरावरील प्रकल्पामध्ये वापरले जाणार आहे. सेंट्रल सॉलेनॉइडच्या नावाच्या या चुंबकाच्या मदतीने आयटीईआरमध्ये सूर्यामधील ऊर्जा निर्मितीप्रमाणे ऊर्जा निर्माण करण्याच्या प्रयत्न केला जाणार आहे. हे चुंबक एवढे शक्तीशाली आहे की ते एखाद्या विमानवाहू युद्धनौकेला ६ फुटांपर्यंत उचलू शकते. फ्रान्समधील केंद्रीय ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या केंद्रस्थानी हे लोकचुंबक असणार आहे.

बिटिंग हार्ट ऑफ मशीन असेही हा महाकाय चुंबकाला म्हटले जाते. जनरल अ‍ॅटॉमिक्सने या चुंबकाची संकल्पना, निर्मिती आणि रचना केली असून हे चुंबक दक्षिण फ्रान्समधील आयटीईआरमध्ये कंपनीच्या माध्यमातूनच पाठवले जाणार आहे. कोरोना महामारीच्या कालावधीमध्येही आयटीईआरसाठी आवश्यक असणारे अनेक सुटे भाग फ्रान्समध्ये आयात केले जात होते. आता सॉलेनॉइडची डिलेव्हरी जनरल अ‍ॅटॉमिक्सने दिल्यानंतर आयटीईआरमधील सन ऑन अर्थच्या प्रकल्पामध्ये फ्युजनच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती सुरु केली जाईल. जनरल अ‍ॅटॉमिक्सने जारी केलेल्या माहितीनुसार, आयटीईआरमधील सेट्रोल सॉलेनॉइड हे सर्वात मोठे चुंबक असणार आहे. हे चुंबक सहा मॉड्युल्सपासून तयार करण्यात आले आहे.

सेट्रोल सॉलेनॉइड आयटीईआरमधील प्रयोगात महत्वाची भूमिका बजावणार आहे. आयटीईआरच्या प्रयोगात फ्युजनच्या माध्यमातून ऊर्जानिर्मितीचा प्रयत्न असल्यामुळे आयटीईआरमधील प्लाझमामध्ये या चुंबकाच्या मदतीने विद्युत प्रवाह निर्माण केला जाईल. यामुळे फ्युजनच्या माध्यमातून निर्माण झालेली ऊर्जा एका ठराविक मर्यादेत राहण्यास मदत होईल. या चुंबकाची उंची ५९ फूट असून रुंदीला ते १४ फूटांपर्यंत असणार आहेत. या चुंबकाचे वजन हे काही हजार टनांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे.

एखाद्या विमानवाहू युद्धनौकेला या चुंबकामुळे निर्माण होणारी शक्ती ही सहा फुटांपर्यंत उचलण्यासाठी पुरेशी आहे. या चुंबकाच्या ऊर्जेची तुलना करायची झाल्यास त्यापासून निर्माण होणारी ऊर्जा ही पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीपेक्षा २ लाख ८० हजार पट अधिक असेल. या चुंबकाचा वापर करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. हे चुंबक सहा भागांपासून तयार होत असून प्रत्येक भागाच्या निर्मितीसाठी दोन वर्षांचा कालावधी लागला आहे.

या आयटीईआर प्रकल्पासाठी जगभरातील अनेक देशांनी पुढाकार घेऊन सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. ३५ वर्षांच्या करारामध्ये चीन, युरोपियन महासंघ, भारत, जपान, कोरिया, रशिया आणि अमेरिकेचा समावेश आहे. हजारो इंजिनियर्स आणि वैज्ञानिक आयटीईआरचे प्रयोग करण्यासाठी काम करत आहेत.