राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११८ वा दीक्षान्त समारंभ संपन्न


मुंबई : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११८ वा दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत पार पडला. यावेळी लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे दीक्षान्त भाषण झाले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत व कुलगुरु डॉ. नितीन करमळकर उपस्थित होते.

समाजाने आपल्यासाठी काय केले असा विचार न करता आपण समाजासाठी काय करू शकतो याचा विचार स्नातकांनी करावा. लोकमान्य टिळकांचा आदर्श पुढे ठेवून युवकांनी कर्मयोगी व्हावे. उच्च ध्येय बाळगून कठोर परिश्रम केल्यास देश प्रगती करेल, असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

स्नातकांनी कम्फर्ट झोनमधून बाहेर यावे तसेच स्वतःसोबत समाजाचादेखील विचार करावा असे प्रतिपादन सुमित्रा महाजन यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘रासेयो’ स्वयंसेवकांनी कोरोना काळात प्रशासनाला सर्वतोपरी मदत केल्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रासेयो विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. दीक्षान्त समारंभात १६१५९१ पदव्या, ५८ एम.फिल., ४६५ पीएच.डी. व ११९ सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. वेदांत उमेश मुंदडा या दृष्टीहीन विद्यार्थ्याला राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा उत्कृष्ट विद्यार्थी सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.