लष्करी गणवेशात सोशल मीडियावर प्रकटला आमीर खान

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्याने महाराष्ट्र अनलॉक होऊ लागला आहे. परिणामी लॉकडाऊन काळात थांबलेली अनेक चित्रीकरणे पुन्हा सुरु होऊ लागली आहेत. बॉलीवूड अभिनेता आमीर खानने त्याच्या लालसिंग चढ्ढा चित्रपटाचे शुटींग सुरु केले आहे. दरम्यान मंगळवारी त्याच्या लगान चित्रपटाची २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चाहत्यांना धन्यवाद देणारा एक व्हिडीओ आमीरने शेअर केला असून त्यात तो लष्करी गणवेशात दिसत आहे.

आमीरने आगामी लालसिंग चढ्ढावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता यावे यासाठी या वर्षाच्या जानेवारीपासून त्याचा मोबाईल बंद केला होता आणि सोशल मीडियाचा निरोप घेतला होता. आमीरने त्याचे ट्विटर, इन्स्टाग्राम बंद केले होते. या काळात आमीर त्याच्या आमीर प्रोडक्शन कंपनीच्या माध्यमातून सोशल मिडिया संपर्कात होता. मंगळावरी याच अकौंटवरून त्याने व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओ मध्ये आमीर म्हणतो,’ लगानला २० वर्षे पूर्ण झाली हा फार आनंदाचा दिवस आहे. हा असा चित्रपट आहे ज्याने आमच्याकडून प्रचंड प्रमाणात लगान वसूल केला पण तेव्हढाच लगान आम्हाला मिळवूनही दिला. लगान हे मोठे आव्हान होते आणि त्यात जे माझ्या बरोबर होते त्या सर्वाना धन्यवाद. आशुतोष गोवारीकर, कास्ट, क्रू, वितरक आणि प्रेक्षक या साऱ्यांना आमीरने धन्यवाद दिले आहेत. आगामी लालसिंग चढ्ढा मध्ये आमीरची हिरोईन आहे करीना कपूर.