काल दिवसभरात 60 हजार 471 नव्या कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली – देशात जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असली तर मृतांचा आकडा धडकी भरवणारा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 60 हजार 471 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर काल देशात 2726 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तब्बल 75 दिवसांनी देशात एका दिवसात एवढ्या कमी रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या 24 तासांत एक लाख 17 हजार 525 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

काल (सोमवारी) महाराष्ट्रात 8,129 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 14,732 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 200 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची काल नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास सहा हजारांनी जास्त नोंदवण्यात आली आहे. राज्यात काल एकूण 1,47,354 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 15 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 13 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकूण 56,54,003 कोरोनाबाधित रुग्ण आजपर्यंत बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.55 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 200 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.90 टक्के एवढा आहे.

गेल्या 24 तासांत मुंबईत 700 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर काल दिवसभरात 725 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,84,107 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 15,550 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 672 दिवसांवर गेला आहे.