कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये होणारी घरवापसी रोखण्यासाठी भाजपकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. पण यामध्ये भाजपला म्हणावे तसे यश येताना दिसत नाहीत. नुकतीच राज्यपाल जगदीप धनखर यांची भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी सुवेंदु अधिकारी यांच्यासोबत जाऊन भेट घेतली. पण भाजपचे २४ आमदार या बैठकीमध्ये अनुपस्थित असल्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. बंगाल विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते असणाऱ्या सुवेंदु अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार राजभवनामध्ये सोमवारी सायंकाळी पक्षाच्या आमदारांच्या एका प्रतिनिधिमंडळाने राज्यपालांची भेट घेतली.
पश्चिम बंगाल : राज्यपालांच्या बैठकीमध्ये भाजपचे ७४ पैकी २४ आमदार ‘अनुपस्थित’
राज्यपालांसोबत भाजप नेत्यांनी घेतलेल्या बैठकीचा हेतू बंगालमध्ये सुरु असणाऱ्या अयोग्य घटनांबद्दलची माहिती देण्याचा आणि इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याचा होता. पण भाजपच्या ७४ पैकी २४ आमदार यावेळी गैरहजर असल्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीआधी तृणमूलमधून भाजपमध्ये आलेले नेते पुन्हा घरवापसी करणार का अशापद्धतीच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी काही आमदारांचा गट सुवेंदु अधिकारी यांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे भाजपमध्ये पक्षांतर्गत दुही असल्याचेही सांगण्यात येत आहे.
याबाबत एनडीटीव्हीने दिलेल्या एका वृत्तानुसार भाजपचे अनेक आमदारा नाराज असून काहीजण तृणमूलच्या संपर्कात आहेत. पुन्हा तृणमूलमध्ये अनेक भाजप आमदार प्रवेश करु शकतात, अशी शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. मुकुल रॉय यांनी मागील आठवड्यामध्ये भाजपमधून पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश केला. राजीव बॅनर्जी, दीपेंदु विश्वास आणि सुभ्रांशु रॉय यांच्यासहीत इतर अन्य नेते सुद्धा लवकरच तृणमूलमध्ये परततील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजपच्या तिकीटावर मुकुल रॉय यांनी निवडणूक लढवली असून त्यांनी कृष्णानगर उत्तर मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
दुसरीकडे मुकुल यांच्यासोबत तृणमूल सोडणाऱ्या आणि आता पुन्हा पक्षात येऊ पाहणाऱ्या नेत्यांबद्दल पक्षाकडून पुन्हा सकारात्मक विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आधीच स्पष्ट केले आहे. आपल्या संपर्कात ३० हून अधिक आमदार असल्याचा दावा तृणमूलने केला आहे. रॉय यांच्या आधी सोनाली गुहा आणि दीपेंदु बिस्वाससारख्या नेत्यांनी थेट समोर येत तृणमूलमध्ये परत येण्याची इच्छा व्यक्त करत मुख्यमंत्री बॅनर्जी यांची माफी मागितली होती.
सोमवारी मुकुल रॉय यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा नाही दिला, तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी आपण विधानसभा अध्यक्षांकडे पक्षांतर कायद्याअंतर्गत रॉय यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारा अर्ज करु असे अधिकारी यांनी म्हटले आहे. अधिकारी यांनी रॉय यांचा थेट उल्लेख न करता कृष्णानगर उत्तर मतदारसंघातील आमदाराने पक्षांतर केले आहे. आम्हाला अपेक्षा आहे की ते विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतील. जर त्यांनी उद्यापर्यंत राजीनामा नाही दिला तर आम्ही बुधवारी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून पक्षांतर कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी करु, असे अधिकारी यांनी म्हटले आहे.