हज कमिटी ऑफ इंडियाने रद्द केले यंदाच्या वर्षीचे हज यात्रेचे सर्व अर्ज


नवी दिल्ली – हज समिती ऑफ इंडियाने हज यात्रेसाठीचे यंदाचे (2021) सर्व अर्ज मंगळवारी रद्द केले आहेत. हज 2021 ला सौदी अरेबियाने केवळ देशातील नागरिकांना आणि रहिवाश्यांना मर्यादित संख्येने परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे की कोरोना सर्व देशभर पसरलेल्या स्थितीमुळे देशातील नागरिकांना आणि रहिवाशांना मर्यादित संख्येने हज 2021 ला जाऊ देण्याचा निर्णय सौदी अरेबियाने घेतला आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय हज यात्रा रद्द करण्यात आल्याचे सागण्यात आल्यामुळे हज 2021 चे सर्व अर्ज रद्द करण्याचा निर्णय हज समिती ऑफ इंडियाने घेतला आहे.

सौदी अरेबियाने शनिवारी जाहीर केले की यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे हज यात्रेसाठी 60,000 पेक्षा जास्त लोकांना सहभागी होता येणार नाही. या संसर्गामुळे गेल्या वर्षी देखील या यात्रेवर सावट आले होते. आता यंदाच्या वर्षी मर्यादित लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. यात लहान मुलांचाही समावेश असणार आहे.

सौदी अरेबियात आधीच राहणाऱ्या सुमारे 1000 लोकांना गेल्या वर्षीच्या हजमध्ये भाग घेण्यासाठी निवडण्यात आले होते. यात 160 वेगवेगळ्या देशांतील रहिवासी होते, ज्यांचे सामान्यत: हज येथे प्रतिनिधित्व असते. एक तृतीयांश सौदी सुरक्षा कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचारी होते. दरवर्षी सुमारे 2 दशलक्ष मुस्लिम हज यात्रा करतात.