शिक्कामोर्तब! श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक


नवी दिल्ली : अलीकडेच श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाची घोषणा केली होती. पण यात प्रशिक्षकाच्या नावाविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे. श्रीलंका दौर्‍यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड असणार आहे.

सौरव गांगुलीने म्हटले की, श्रीलंका दौर्‍यावर राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षक असतील. गेल्या काही वर्षांपासून इंडिया अंडर 19 आणि इंडिया ए संघाचे प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड काम करत आहेत. या काळात भारताच्या युवा खेळाडूंना घडवण्याचे श्रेय त्यांनाच जाते.

भारत या काळात एकाच वेळी दोन मालिका खेळणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौर्‍यावर आहे. तिथे टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याचबरोबर शिखर धवनच्या नेतृत्वात आणखी एक भारतीय संघ श्रीलंकेत 13 ते 25 जुलै दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन टी -20 मालिका खेळेल. इंग्लंड दौर्‍याचा भाग नसलेल्या या खेळाडूंना श्रीलंका दौर्‍यासाठी जागा मिळाली आहे.

शिखर धवनला या दौर्‍यात टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला उपकर्णधार म्हणून स्थान देण्यात आले आहे. याशिवाय चेतन साकारिया, नितीश राणा, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड आणि कृष्णप्पा गौतम या तरूण चेहर्‍यांनाही प्रथमच टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले आहे.

श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ – शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.