पुण्यातील या दोन महानगरपालिकांमध्ये काही मीटरचे असूनही येथे आहे अनलॉकची वेगवेगळी नियमावली!


पुणे – : सायंकाळी सात पर्यंत पुणे शहरातील सर्व दुकाने खुली राहणार आहेत. पण अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात मात्र याबाबत वेगळी नियमावली आहे. तेथील दुकानांना फक्त सायंकाळी चार वाजेपर्यंतचीच मुभा देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यापेक्षा एक हजार अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे. पण तरी देखील पिंपरी चिंचवड शहरात आणि पुण्यात वेगवेगळी नियमावली का? असा प्रश्न पिंपरी चिंचवडकरांना पडला आहे. तर यामागे पॉझिटिव्ह रेटचा निकषाचे कारण सांगण्यात येत आहे. या निकषात बसण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराला अवघ्या 0.31 टक्के एवढा पॉझिटिव्ह रेट कमी करावा लागणार आहे.

आजचा पुणे महानगरपालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह रेट हा पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. पॉझिटिव्ह रेट पाच टक्क्यांखाली आल्यानंतर अनलॉकचा पुढचा टप्पा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी जाहीर केला होता. त्यानुसार पुण्यात कालपासून सर्व दुकाने खुली ठेवण्याला सकाळी सात ते सायंकाळी सात अशी परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल रात्री दहा पर्यंत खुली ठेवण्याची, तर रात्री अकरा पर्यंत पार्सल सेवेची ही परवानगी देण्यात आली आहे.

तीन हजारांच्या घरात अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या पुणे शहरात कालपासून अनलॉकची ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. पण पुण्यापासून अवघ्या काही मीटर अंतरावरील पिंपरी चिंचवडमध्ये अवघे एकविशे कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पण तरी देखील ही येथे पुणे शहराची नियमावली लागू होत नाही. म्हणूनच पुण्यातील खडकीत कालपासून सायंकाळी सात पर्यंत दुकाने खुली ठेवण्यात आली. पण या दोन्ही शहरांना दुभागणारा हॅरीस पूल ओलांडला की मात्र वेगळे चित्र पहायला मिळते. हा पूल ओलांडताच दापोडी लागते आणि येथील दुकाने मात्र सायंकाळी चार वाजताच बंद करण्यात आली. तर हॉटेल चालकांना रात्री 10 पर्यंत पार्सल सेवेची परवानगी आहे.

पिंपरी चिंचवडमधील अॅक्टिव्ह रुग्ण पुण्याच्या तुलनेत एक हजारांपेक्षा कमी आहेत. मग येथे अनलॉकची नवी नियमावली पालकमंत्री अजित पवारांनी का लागू केली नाही? असा प्रश्न पिंपरी चिंचवडकरांना पडला आहे. ही नियमावली लागू करताना पॉझिटिव्ह रेट पाच टक्केपेक्षा कमी असायला हवा, असा निकष लावण्यात आला आहे. या निकषात पिंपरी चिंचवड अद्याप मोडत नाही. कारण पिंपरी चिंचवडचा पॉझिटिव्ह रेट हा 5.31 टक्के एवढा आहे. म्हणूनच पिंपरी चिंचवडकरांना अनलॉकची कालपासूनची शिथिलता मिळालेली नाही. अजित पवारांच्या उपस्थित होणाऱ्या पुढच्या बैठकीपर्यंत 0.31 टक्के पॉझिटिव्ह रेट कमी करण्याचे आव्हान आहे. पिंपरी चिंचवडला प्रशासनाला हे आव्हान पूर्ण करायचे असेल तर शहरवासियांचा हातभार गरजेचा आहे. तरच अनलॉकची नवी नियमावली येथे लागू होऊ शकतो.