भगतसिंह कोश्यारी यांच्याकडेच राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या 12 सदस्यांच्या नावाची यादी


मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडेच ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या 12 सदस्यांच्या नावाची यादी असल्याचे समोर आले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अपिलावर राज्यपालांच्या उपसचिव प्राची जांभेकर यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. त्यात ही यादी राज्यपालांकडे असल्याचे समोर आले आहे.

राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने 6 नोव्हेंबर 2020 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली होती. ही यादी राज्यपालांना सुपूर्द करुन आता 7 महिने उलटले तरीही त्यांनी अद्याप नियुक्ती केलेली नसल्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण झाला आहे.

त्यानंतर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारात या 12 सदस्यांच्या नावांची यादी राज्यपालांकडे नसल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली होती. यादी राज्यपालांकडे नाही तर नेमकी कोणाकडे आहे, असा सवाल करत अनिल गलगली यांनी आव्हान दिले होते. त्यावर राजभवन सचिवालयात आज (15 जून) उपसचिव प्राची जांभेकर यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. या सुनावणीत संबंधित यादी राज्यपालांनी स्वतःकडे ठेवल्याचे सांगण्यात आले. आता राज्यपालांनी निर्णय घेतल्यावरच माहिती मिळू शकणार आहे.

तसेच राज्यपालांकडे यादी आहे आणि निर्णय झाल्यावर माहिती उपलब्ध करुन देण्यात येईल. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे माहिती द्यावी किंवा नाही? याबाबत सल्लामसलत केला जाईल, असे प्राची जांभेकर यांनी सांगितले.