वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा


नवी दिल्ली – आता फक्त काही तासांचा अवधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला शिल्लक राहिला आहे. हा सामना १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी नुकतीच १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

या सामन्यासाठी विराट कोहलीकडे टीम इंडियाचे कर्णधारपद, तर अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांना संधी मिळाली आहे, तर केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांना वगळण्यात आले आहे. मधल्या फळीत कोहली आणि रहाणे व्यतिरिक्त आधारस्तंभ चेतेश्वर पुजाराचा समावेश आहे. हनुमा विहारीलाही संधी मिळाली आहे.


यष्टीरक्षक म्हणून संघात ऋषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांना स्थान मिळाले आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांना वगळण्यात आले असून रवींद्र जडेजा आणि आर अश्विनला संघात जागा मिळाली आहे. जलदगती गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादवला या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरी केलेल्या हैदराबादच्या मोहम्मद सिराजही स्थान देण्यात आले आहे.

न्यूझीलंडने या सामन्यापूर्वी सामन्यासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असलेल्या २० लोकांच्या संघातून पाच खेळाडूंना वगळण्यात आले आहे.

भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान सहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड संघ – केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉन्वे,कॉलिन डी ग्रॅन्डहोमे, मॅट हेनरी, काइल जेमिसन, टॉम लाथम, हेनरी निकोलस, एजाज पटेल, टीम साउदी, रॉस टेलर, नील वॅग्नर, बीजे वॉटलिंग, विल यंग.