या मुस्लीम देशात आहे जगातील सर्वात मोठी विष्णू मूर्ती

हिंदू धर्मात विष्णू जगाचा पालनहार मानला गेला आहे. भारतात विष्णूची अनेक मंदिरे आणि मूर्ती आहेत. विष्णूची हजार नावे आहेत आणि त्या नावानुसार मूर्ती बनविल्या गेल्या आहेत. विष्णू हे समृद्धी आणि वैभवाचे प्रतिक आहे. मात्र विष्णूची सर्वात भव्य मूर्ती भारतात नाही तर ती आहे एका मुस्लीम देशात.

इंडोनेशियाच्या बाली बेटावर ही गरुड विष्णूची मूर्ती आहे. ती इतकी भव्य आहे की पाहणाऱ्याचे डोळे विस्फारल्याशिवाय राहत नाहीत. ही मूर्ती बनविण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च केले गेले आहेत. तांबे आणि पितळ या धातूंचा वापर मूर्ती बनविताना केला गेला आहे. ही मूर्ती १२२ फुट उंच आणि ६४ फुट रुंद असून ती बनविण्यासाठी २४ वर्षे लागली असे सांगतात. २०१८ मध्ये ती पूर्ण झाली आणि तेव्हापासून जगभरातून पर्यटक तसेच हिंदू भाविक या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.

१९७९ मध्ये इंडोनिशियामध्ये राहणारे मूर्तिकार बाप्पा न्यूमन नुआती याना आपण एखादी विशाल मूर्ती बनवावी अशी इच्छा होती. अशी मूर्ती जगात कुठे नसेल आणि पाहणारा ती पाहतच राहील असे त्यांचे मूर्तीबाबत स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी एक योजना तयार केली आणि पैसे जमवायला सुरवात केली. १९९४ मध्ये काम सुरु केले पण जमलेले पैसे संपले त्यामुळे २००७ ते २०१३ या काळात मूर्तीचे काम बंद राहिले. त्यानंतर पुन्हा पैसे जमल्यावर काम सुरु झाले ते मूर्ती पूर्ण झाल्यावरच थांबले.

बालीच्या उंगासन येथील या मूर्तिकार नुआती यांना भारत सरकारने सन्मानित केले असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले गेले आहे. या मूर्तीची ख्याती जगभर झाली आहे.