लांबसडक पापण्यांची मालकीण आहे यु, गिनीज मध्ये आहे नाव

जगात रोजच काही ना काही नवीन विक्रम होत असतात. त्यातील काही नैसर्गिक असतात तर काही अजब गजब किमया करून केले जातात. अति उंची, कमी उंची, अति जाडी, एकदम बारीक, लांब केस, लांब नखे, लांब दाढी, लांब मिशी अश्या बाबतीत सुद्धा विक्रम होतात आणि त्यांची नोंद गिनीज बुक मध्ये केली जाते. पण सर्वाधिक लांब पापण्या असू शकतात याची कल्पना आपण करू शकत नाही.

दाट, लांब पापण्या हे सौंदर्याचे लक्षण मानले जाते पण या पापण्या किती लांब असाव्यात याला मर्यादा येते. चीन मधील यु नावाच्या महिलेच्या पापण्या याला अपवाद म्हणाव्या लागतील. २०१६ मध्ये यु च्या पापण्यांच्या केसांची लांबी ४.८८ इंच होती. आत्ता तिने स्वतःचाच हा विक्रम मोडला आहे. गेल्या पाच वर्षात तिच्या पापणी केसांची लांबी चक्क २०.५ इंचावर गेली असून पापणीचे हे केस तिच्या गालावरून मानेपर्यंत येतात. यु ची नोंद गिनीज बुक मध्ये झाली आहे.

विशेष म्हणजे यु सांगते, २०१५ पर्यंत तिच्या पापण्यांचे केस सर्वसामान्य माणसांप्रमाणेच होते. २०१५ मध्ये दीड वर्ष ती पहाडी भागात राहत होती आणि तेथून परतल्यावर तिच्या पापणीच्या केसांची लांबी वाढू लागली. त्यामुळे हा भगवान बुद्धाचा आशीर्वाद आहे अशी तिची भावना आहे. यु आनंदी आहे. ती म्हणते या पापण्यांमुळे मी तरुण दिसते, लोकांच्या चटकन नजरेत भरते. तिला जादा मेकअपची गरज लागत नाही. या पापण्यांचे केस काही वेळा तुटतात पण पुन्हा वाढतात असेही ती सांगते.