या मास्कच्या संपर्कात येताच निष्क्रीय होणार करोना विषाणू

पुण्याच्या थिंक्र टेक्नोलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप ने असा मास्क तयार केला आहे की या मास्कच्या संपर्कात येताच करोना विषाणू निष्क्रीय होणार आहे. करोनाची दुसरी लाट थोडी ओसरून तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही चांगली बातमी आली आहे. या मास्क विषयी विज्ञान व प्रौद्योगिकी विभाग ( डीएसटी) कडून सोमवारी माहिती दिली गेली आहे.

करोना पासून बचाव होण्यासाठी मास्क लावणे फार महत्वाचे आहे. करोना पासून संरक्षण मिळावे म्हणून अनेक पदर असलेले मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र हा नवा मास्क करोनाचा दम काढणार आहे. या मास्कवर विषाणू रोधी एजंटचा लेप दिला गेला आहे. चाचणीत या मास्क वरील लेप सार्स कोव २ ला निष्क्रीय बनवीत असल्याचे दिसून आले आहे. हा लेप मानवी वापरासाठी सुरक्षित आहे कारण यात वापरली गेलेली सामग्री साबणात वापरली जाते.

या लेपमध्ये साबण आणि कॉस्मेटिक्स मध्ये वापरले जाणारे सोडियम ओलेफिन सल्फोनेट वर आधारित रसायन वापरले गेले आहे. या लेपच्या संपर्कात येताच करोना विषाणूचे बाहेरचे कवच नष्ट होते. सामान्य तापमानात याचा वापर सहज करता येतो. स्टार्टअपचे सहसंस्थापक शीतलकुमार जामबाद म्हणाले करोना काळात मास्क वापराचे महत्व खूप आहे पण सर्वसामान्य नागरिक घरगुती मास्कचा वापर अधिक प्रमाणात करत होते. हे मास्क गुणवत्तेत कमी ठरत होते त्यामुळे चांगल्या गुणवत्तेचे मास्क ही गरज बनली होती. त्यातून या मास्कची कल्पना सुचली.